UP – मुलीच्या छेडछाडीला विरोध, 55 वर्षीय महिलेला चौघांची मरेपर्यंत मारहाण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘महिलांची सुरक्षा प्रथम’, असा डांगोरा पिटत असले तरी परिस्थिती मात्र बिकट आहे. ताजी घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मंसूरपूर पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या नारा गावात (Nara village under Mansurpur police station) घडली आहे. मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने रविवारी रात्री चौघांनी 55 वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. मयत महिलेच्या मुलाने गावातील चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

मयत महिलेचा मुलगा हंसराज याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या आकाश, गोपी, बिजेंद्र आणि राजेश या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे चौघे पीडित कुटुंबाच्या घरातील मुली, सुना यांना अश्लील हावभाव करून त्यांची छेड काढत होते. अनेकदा विरोध करूनही त्यांचे हे कृत्य सुरूच होते.

रविवारी रात्री चारही आरोपींनी मुलीची छेड काढली. याला 55 वर्षीय आई सेवती देवी (Sevti Devi) यांनी विरोध केला. चौघांनी पीडितेच्या घरात घुसून लाठ्या-काठ्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

जखमी अवस्थेत सेवती देवी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंसूरपूर पोलीस स्थानकाचे प्रमुख के.पी. सिंह यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या