IPL 2022 स्पर्धेला संपूर्ण सुरक्षा, दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे वृत्त निराधार – महाराष्ट्र पोलीस

IPL क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथील मैदानावर दिनांक 26 मार्च पासून खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून याभागाची रेकी झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. मात्र हे वृत्त महाराष्ट्र पोलीस विभागाने फेटाळून लावले असून असे कोणतेही इनपूट नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी आयपीएल स्पर्धांना संपूर्ण सुरक्षा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेलवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेले नाही, असे महाराष्ट्र पोलिसांकडून पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयपीएलच्या पंधराव्या मोसमामध्ये 10 संघ सहभागी होणार असून या क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या लीग स्पर्धेत यंदा 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएलचा पहिला सामना 26 मार्चला खेळला जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवसांचा कालावधी बाकी असतानाच दहशतवाद्यांनी हॉटेलपासून मैदानांपर्यंत रेकी केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त मुंबई पोलिसांनी निराधार असल्याचे म्हटले असून रेकी झाल्याची कोणताही माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे.