Recipe- ऋषिपंचमीची भाजी

फोटो सौजन्य- गुगल

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिश्र भाजी म्हणजेच ऋषीची भाजी. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाजीत फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. अत्यंत कमी कॅलरीज असलेली ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचे कारण म्हणजे सेंद्रीय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा वापर यात केला जातो.

फोटो सौजन्य- गुगल
फोटो सौजन्य- गुगल

साहित्य:
अळूची पाने आणि देठे, सोलून आणि चिरून- 1 कप
लाल भोपळा, सोलुन आणि कापून- ½ कप
माठ, चिरून- ½ कप
भेंडी, चिरून- ¼ कप
पडवळ, चिरून- ¼ कप
तूप – एक चमचा
हिरव्या मिरच्या, चिरून- 3 ते 5 किंवा वैयक्तिक आवडीनुसार
जिरे – अर्धा टिस्पून
चिंचेचा कोळ – ½ ते 1 टिस्पून किंवा चवीनुसार
खवलेले ओले खोबरे- ¼ कप ते ½ कप /आवडीनुसार
मीठ- चवीनुसार

कृती:
सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या नीट साफ करून घ्या.
अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुवून टाका.
मिरच्यांचे तुकडे करा. तिखट आवडत असेल तर ठेचा करा.
एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा तुपात जिरे आणि मिरच्यांची फोडणी घालावी.
यातील अर्धी फोडणी बाजूला ठेवून उर्वरित फोडणीत भेंडी परतवावी,
उरलेल्या अर्ध्या फोडणीत भोपळा आणि पडवळ अशा भाज्या क्रमाने शिजवून घ्याव्यात.
अळू आणि लालमाठही वेगळा शिजवून घ्यावा.
मग सर्व भाज्या एकत्र करून त्या शिजवण्यासाठी ठेवाव्यात.
खवलेले खोबरे टाकून शिजवावे, वर चवीनुसार मीठही घालावे.
भाजी शिजत आली की त्यात चिंचेचा कोळ घालावा.
एक वाफ काढली की झाली ऋषीची भाजी तयार.

टीप-
भाजी जोराने ढवळू नये, नाहीतर भाजीचा लगदा होतो.
भाजीत वरून पाणी घालू नका, कारण भाजीला आधीच पाणी सुटलेले असते.
ज्यांना चिंचेचा कोळ चालत नसेल त्यांनी वाटीभर घट्टसर ताक वापरलं तरी चालतं
या भाज्यांमध्ये अंबाडीची भाजी नाही, ती वापरत असल्यास चिंच किंवा ताक वापरलं नाही तरी चालते.
यात शिराळे, घोसाळे, सुरण, कणीस, अळुच्या मुंडल्या अशा अनेक भाज्या वापरल्या तरी चालतात.

आपली प्रतिक्रिया द्या