‘सामना’ प्रभाव – सत्कार सोहळ्याच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चार वेळा बदल

>>विजय जोशी, नांदेड

अतिवृष्टीने बरबाद झालेल्या पूरग्रस्त भागांसाठी दिलेला कमी वेळ तसेच विविध विकास कामांच्या उद्घाटनासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि राजकीय मंडळींमध्ये झालेले मतभेद या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या दौऱ्यात चार वेळा बदल केले आहेत. पूरग्रस्त भागासाठी ते आता 35 मिनिटे वेळ देणार आहेत, तर जवळपास 192 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपुजन रद्द करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात काल आणि आज पुन्हा जोरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः बरबाद झाला असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्या कार्यक्रमात केवळ 5 मिनिटे पूरग्रस्त बाधीत भागाची पाहणी करण्यासाठी वेळ दिला. ‘दैनिक सामना’ने यासंदर्भात आवाज उठवून अतिवृष्टीने बरबाद झालेल्या ‘नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे सत्कार सोहळे‘ या शिर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जबरदस्त चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा क्रमांक 2 जाहीर केला. त्यात थोडा वेळ पूरग्रस्तांसाठी वाढवून देण्यात आला. तसेच 7 तारखेच्या रात्री मुख्यमंत्री येणार होते, त्याऐवजी आज सकाळी दहा वाजता ते येणार होते.

शिंदे गटाचे दोन मेळावे नांदेड आणि हिंगोली या दौऱ्यात आयोजित करण्यात आले होते. तसेच शहरातील 192 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपुजन ते करणार होते. यात परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्यााचे दुपदरीकरण तसेच हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा रोड दुपदरीकरण-145 कोटी, नांदेड मनपा हद्दीतील विविध रस्त्यांचे भूमिपुजन-15 कोटी, आसना नदीवरील पुलाचे बांधकाम भूमिपूजन-32 कोटी अशा 192 कोटींच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार होता. यासंदर्भात तयारीही पूर्ण झाली. मात्र निमंत्रण पत्रिकेत माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळल्याने काँग्रेस आक्रमक झाली. मुंबईमध्ये यासंदर्भात अदृष्य हातांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी सहकार्य केलेल्या मंडळींनी आकांडतांडव केला. आणि रात्री दीड वाजता पुन्हा हा दौरा रद्द झाला.

विशेष म्हणजे अतिवृष्टी ग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी आता 35 मिनिटे  वेळ दिला आहे. हेही नसे थोडके, पाच मिनिटांचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा 35 मिनिटांवर आला, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.

नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असताना व जवळपास 85 टक्के पिके वाया गेली असताना वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार सोहळ्यांचे झालेले आयोजन आता पूर्णतः रद्द झाले आहे. सुधारीत अंतिम दौरा क्रमांक 4 नुसार राज्याचे मुख्यमंत्री आता दुपारी 2.45 वाजता नांदेडला पोहंचणार असून, सचखंड गुरुव्दाराचे दर्शन करुन ते दुपारी 3.40 वाजता गोदावरी अर्बन बँकेस भेट देणार आहेत. सायंकाळी 4.20 वाजता ते 4.55 मिनिटांपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधीत भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे शिंदे गटाच्या मेळाव्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यात जातील. मात्र हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी त्यांनी वेळ दिला नाही. या अंतिम दौऱ्यात 192 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमाला दांडी मारण्यात आली आहे. अर्थात हे कार्यक्रम स्थगित झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे. या सर्व विकास कामाच्या जाहिरातीवर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. तो मात्र वाया गेला आहे.