उरण पंचायत समितीचे सभापती सागर कडूंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

623

शेकापचे उरण पंचायत समितीचे विद्यमान सभापती अॅड. सागर कडू यांच्या विरोधात फसवणुकीच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमिन विक्री प्रकरणी विद्यमान सभापतींवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने उरण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण पंचायत समितीचे सभापती अॅड. सागर कडू यांनी चाणजे महसुली गावाच्या क्षेत्रामधील काही जमिन घर बांधण्याकरिता आठ गरजुंना विक्री केली होती. सदर जागा विक्रीचे नोटरी खरेदीखत करून त्या बदल्यात फिर्यादीकडून लाखो रुपये धनादेशद्वारे स्वीकारले होते. वारंवार विनंती करूनही आरोपी कडू यांनी पैसे घेतलेल्या जागेचा नोंदणीकृत दस्त करून दिला नाही. त्याचप्रमाणे जागेचा ताबाही फिर्यादीस दिला नाही. व्यवहार पूर्ण करण्यासही टाळाटाळ केली म्हणून फिर्यादी रविंद्र गावंड (वय -54, रा.ओमकार कॉलनी, कुंभारवाडा) यांनी अखेर उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनीही 52 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सभापती अॅड. सागर कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल आहेर अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या