गव्हाण फाटा मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी, सोमवारपासून आमरण उपोषण

533

उरण येथील दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते करळ फाटा या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच इतर मागण्यांसाठी आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. संघटनेतर्फे अजित म्हात्रें यांच्यासह दिघोडे येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणात परिसरातील अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते करळ फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत आहे. प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या अवजड वाहतूकीवर नियंत्रण नसल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्याशिवाय नादुरुस्त रस्ते, बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या समस्यांमुळे मात्र या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते करळ फाटा या एकेरी मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, दास्तान फाटा ते दिघोडे या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. गव्हाण फाटा ते दिघोडे आणि गव्हाण फाटा ते करळ फाटा मार्गावरील बेकायदेशीर पार्किंग बंद करण्यात यावी आणि वरील मार्गावरील अवजड वाहतूक ठराविक वेळी बंद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाविरोधात मागील काही महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे.

मात्र प्रशासनाकडून अद्यापही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी न्याय हक्कासाठी आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषण सुरू असतानाच उपोषणकर्त्यांसमोरुनच अवजड वाहतूक सुरुच  असल्याने मात्र  प्रशासनाविरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या