योगी आदित्यनाथ आणि उर्दू वृत्तपत्रे

>>मुजफ्फर हुसेन  

hussain1945@yahoo.com

उत्तर प्रदेशात विकासाच्या मुद्द्यांवर भर देणाऱ्या भाजपने अचानक आपली भूमिका बदलली आणि परिणामी प्रचंड बहुमताने भाजप जिंकले. भाजपने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवून दुसरा आश्चर्याचा धक्का दिला. भाजपच्या या भूमिकेचे विश्लेषण देशभरातील उर्दू वृत्तपत्रांनी नादान मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू केव्हाही चांगलाअशा शब्दात केले आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिराचा प्रश्न सर्वात ज्वलंत आहे आणि त्यासाठी योगी आदित्यनाथ काय करू शकतात हे लवकरच कळेल.

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात उर्दू वृत्तपत्रांनी काय म्हटले आहे याचे आकलन करणे आवश्यक आहे. खरे तर लोकशाहीत जनतेने दिलेला निकाल सर्वांनी मान्य करायला हवा. तथापि देशातील अल्पसंख्याकांचे आपले वेगळे मत आहे आणि त्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदार आणि उर्दू भाषिकांची संख्या फार मोठी आहे. त्यांचा प्रभाव कुणालाही नाकारता येणार नाही. मात्र लोकशाही पध्दतीने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीमुळे सारा देश आश्चर्याने थक्क झाला. मुस्लिमांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या खऱ्याखोट्या असू शकतात. पत्रकारितेचा धर्म पाळताना त्यांचे मत, विचारधारा याबाबत विचार करणे आवश्यकच आहे.

मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘उर्दू टाइम्स’ने आपल्या संपादकीयामध्ये लिहिले आहे की, ‘नादान मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू कधीही चांगलाच!’ योगी आदित्यनाथ यांना त्यांनी बुद्धिमान शत्रू म्हटले आहे. संपादकीयात लिहिले आहे की, योगीजींना मुस्लिम आपला कट्टर विरोधक मानतात. मुस्लिम विरोधामुळेच ते हिंदूंमध्ये लोकप्रिय आहेत. भाजपने उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिमास निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. याबाबत विनय कटियार असे म्हणतात की, जर ते भाजपला मतदानच करीत नसतील तर त्यांना उमेदवारी देण्यात काय हशील? परंतु योगींच्या मंत्रिमंडळात एक मुस्लिम मंत्री आहे. त्यामागे तरी औचित्य काय? याचे असे उत्तर दिले जाऊ शकते की, योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी व आपली मुस्लिमविरोधी प्रतिमा सौम्य करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.

मंत्रिमंडळाची घोषणा करण्याआधी योगींनी पक्षात यासंदर्भात निश्चितच चर्चा केलेली असेल. त्यांना मोदींनीच हा सल्ला दिलेला असेल. मुस्लिम योगींना तर विरोधक मानतातच, पण त्यापेक्षा ते मोदींना जास्त विरोधक मानतात. कारण त्यांच्या मते गुजरातेत मोदींचे राज्य असताना मुस्लिमांवर प्रचंड अत्याचार झाले. तरीसुध्दा हिंदुस्थानी जनतेने त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवलेच. गेल्या अडीच वर्षांत मोदींनी बरेच काही केले आणि पुढील काळातही ते बरेच काही करतील. आता एकीकडे तीन तलाकचा मुद्दा पुढे आला, तर दुसरीकडे समान नागरी कायद्याचाही विषय पुढे आला आहे. आतापर्यंत हे सर्व मुद्दे पोतडीत पडून होते. असेही म्हटले जातेय की  योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे आता राममंदिर उभारले जाईल.

अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेवर असेही आता राममंदिर तर आहेच. तेथे पूजाही होते. केवळ भव्यदिव्य मंदिर बनायचे बाकी आहे. परंतु ते तेव्हाच होईल जेव्हा सर्वोच्च न्यायालय निकाल देईल. कोणत्याही सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन तर हे करता येणारच नाही. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत मुस्लिमांनी अनेक आदित्यनाथ पाहिलेत, ते परिस्थितीविषयीदेखील जागरूक आहेत. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंग चांगलेच माहिती आहेत आणि देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहरावसुद्धा माहीत आहेत. त्यांच्या काळातच बाबरी मशीद पाडली गेली. तेव्हा हे नेते गप्प बसून होते. आता जर मुस्लिमांना राममंदिराची भीती असेल तर त्यांनी ती भीती मनातून काढून टाकावी आणि सर्वोच्च न्यायालयावर निर्णय सोपवावा. मोदी सरकारमधील एक केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीसुध्दा हेच म्हटले आहे. आदित्यनाथ नुकतेच खुर्चीवर विराजमान झाले आहेत. त्यांना वेळ दिला पाहिजे, आमचा ना काँग्रेसवर भरवसा आहे ना धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या इतर पक्षांवर. कारण सर्वांनीच हा खेळ खेळला जो आज उघड दुश्मन खेळत आहे. त्यामुळेच संपादकीयात असे म्हटले की, ‘नादान मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू कधीही चांगला.’ त्यांनाही एक संधी देऊन पहावे की, ते मुस्लिमांसाठी कसे सिध्द होतात.

मुंबईतून प्रसिध्द होणाऱया ‘इन्कलाब’ या उर्दू दैनिकाचे शीर्षक होते ‘आश्चर्यकारक निर्णय!’ इन्कलाबने संपादकीयमध्ये लिहिले की, उत्तर प्रदेशात विक्रमी विजय संपादन केल्यानंतर गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवणे पक्षातील बऱयाच लोकांसाठी आश्चर्यात टाकणारा निर्णय ठरला. मात्र यात काही आश्चर्य नव्हते. सात टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यानंतरच भाजपची भूमिका बदलली. प्रगतीच्या घोषणांना हिंदुत्वाची फोडणी दिली गेली. त्यामुळे भाजपला प्रचंड मतदान झाले. परंतु कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की मुख्यमंत्रीपदासाठी असे नाव अंतिम होईल जे जहाल हिंदुत्ववादासाठी प्रसिध्द आहे. भाजपच्या वाजपेयी, यशवंतसिंग, राजनाथ सिंह यांसारख्या यादीतील हे नाव नसून उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी निरंजन ज्योतीसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या यादीतील हे नाव होते.

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय याकरताही आश्चर्यकारक ठरला की, त्याच्या एक दिवस आधी मनोज सिन्हा आणि केशवप्रसाद मौर्य यांची नावे पुढे आली होती. दोघे संतुलित नेते आहेत. लोकांना वाटत होते, या दोघांपैकी कुणा एकाची निवड होईल. परंतु अचानक योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले. आता प्रश्न पडतो की हे आधीपासूनच निश्चित होते का? हा निर्णय घेण्यामागे काही संदेश द्यायचाय का? अन्य दोन्ही नावांशी रा. स्व. संघ सहमत नव्हता का? याबाबत विश्वसनीय सूत्रेही गोपनीयता पाळतात.

समस्या अशी आहे की, भाजप सत्ता वाढवण्याच्या कामात एवढा मग्न झालाय की, त्याला निवडणुका जिंकण्याशिवाय दुसरे काहीच सूचत नाहीये. विद्यमान सत्तेचा अर्धा कालावधी व्यतीत झाला आहे. आता त्यांनी देशात असे वातावरण आणि व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील आणि प्रत्येक वर्गातील लोकांना दिलासा मिळावा. परंतु, सरकारचे सारे लक्ष निवडणुकांकडे आहे हे आपण उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पाहिलेच. आता स्वतः मोदी म्हणतात की ‘ना बैठूंगा ना बैठने दुंगा’ याचा अर्थ ते आतापासूनच २०१९ च्या निवडणुकीचा इशारा देत आहेत.

२०१९ मध्ये केवळ केंद्राच्याच नव्हे तर राज्यांच्याही निवडणुका होतील. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत भाजपने विकासाचा नारा लावलेला होता, परंतु त्याचा सारा जोर हा हिंदुत्वावरच केंद्रित होता. जेणेकरून मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा व्हावा. योगींना मुख्यमंत्री बनवण्यामागे हा उद्देश नाही की यापूर्वीच्या सपा सरकारने केलेल्या प्रगतिशील कामांचे काही उत्तर द्यावे! त्यांनी हिंदुत्वाच्या आधारावर पुढे येण्याचे धोरण स्वीकारले. हिंदुत्ववादी नसलेल्या वर्गाने जो प्रश्न उपस्थित केला तो योग्यच आहे, ते विचारताहेत की, ‘सब का साथ सब का विकास’ ही घोषणा आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा यात कुठेतरी साम्य आहे काय? निश्चितच भाजपकडे याचे उत्तर नाही. परिणामी उर्दू वृत्तपत्रांनी मोदी सरकारवर टीकेचा प्रचंड भडिमार चालवलेला आहे.