नोटाबंदीवरून उर्जित पटेलांची फे-फे उडाली!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीमुळे बँकांत किती पैसा जमा झाला? किती काळा पैसा उघडकीस आला? या अवघ्या देशाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खुद्द रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांच्याकडेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काळय़ा पैशाचा हिशेबच त्यांच्याकडे नाही. संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीपुढे हजर झालेल्या पटेलांची नोटाबंदीवरून विचारलेल्या प्रश्नांवर बोलतीच बंद झाली. त्यांची अक्षरशः फे-फे उडाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500, 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा उघड करण्यासाठी नोटाबंदी केल्याचे सरकारने जाहीर केले होते, परंतु दोन महिने होऊन गेले तरी किती काळा पैसा मिळाला? बँकेत किती पैसे जमा झाले? याचे उत्तर सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे संसदेच्या अर्थविषयक समितीने रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पटेल आज या समितीपुढे उपस्थित राहिले. काँग्रेसचे नेते वीरप्पा मोइली हे या समितीचे अध्यक्ष असून सदस्यांत सर्व पक्षांचे नेते आहेत. माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग हेसुद्धा या समितीचे सदस्य आहेत. पटेल यांनी कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिले नाही. नेमका किती काळा पैसा जमा झाला, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते, अशी माहिती समितीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी दिली आहे.

 नोटाबंदीची प्रक्रिया जानेवारीपासूनच

नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता करण्यात आली. मात्र नोटाबंदीसंदर्भात जानेवारी 2016पासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू होती, अशी माहिती पटेल यांनी दिली.

9.2 लाख कोटींच्या नव्या नोटा चलनात

नोटाबंदीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. ही परिस्थिती कधी सुधारणार याचेही उत्तर पटेल देऊ शकले नाहीत. 9.2 लाख कोटींच्या 2000 आणि 500च्या नव्या नोटा चलनात आल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तरेच नाहीत

नोटाबंदीचा निर्णय नेमका कोणी घेतला? याबाबत पटेल यांना सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले. यावर पटेल यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर काही तासांतच 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. ही शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारचा दबाव होता का, अशीही विचारणा पटेल यांना करण्यात आली.

रिझर्व्ह बँक ही अद्याप स्वायत्त संस्था आहे का? तुमच्यावर केंद्र सरकार दबाव टाकते का? या प्रश्नांचीही पटेल उत्तरे देऊ शकले नाहीत.