आणखी कोण राहिले काय? कृपाशंकरही भाजपात गेले!

3011

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव नाही. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनीही ‘काँग्रेसचा हात’ सोडला असून ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मंगळवारी सकाळी काँग्रेसला रामराम करत असल्याचे जाहीर केले. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या दादागिरीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.

या धक्क्यातून काँग्रेसचे नेते सावरत नाही तोच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मंगळवारी दिवसभरात काँग्रेसला तिसरा धक्का दिला. एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व असणारे आणि मुंबईतील वजनदार उत्तर हिंदुस्थानी नेते म्हणून कृपाशंकर यांना ओळखले जातात. राजीनामा देताना कश्मीरमधील 370 कलमासंदर्भात काँग्रेसने योग्य बाजू घेतली नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये मेगाभरती सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी तिसरी मेगाभरती होणार आहे. यामध्ये इंदापूर विधानसभेच्या जागावाटपावरून नाराज असलेले काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार कृपाशंकर सिंह, सातारा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक आमदार आनंदराव पाटील, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे वजनदार नेते गणेश नाईक आदी नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या