कंगनाने आणखीन हीन पातळी गाठली, बॉलीवूडमधील तेजस्वी मराठी तारका उर्मिला मातोंडकरवर घाणेरडी चिखलफेक!

कधी मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणून कृतघ्नपणाचे दर्शन घडवणारी तर कधी मुंबई पोलिसांच्या बदनामीचे विषारी फूत्कार सोडणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आणखी हीन पातळी गाठली आहे. कंगनाने बॉलीवूडमधील मराठमोळी तेजस्वी तारका उर्मिला मातोंडकरवर घाणेरडी चिखलफेक केली आहे. उर्मिला ही सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, अशी कमेंट करून कंगनाने आपल्या विकृतीचे दर्शन घडवलंय. कंगनाच्या या वक्तव्यावर बॉलीवूडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तिने माफी मागावी अशी मागणी होत आहे.

बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना गेल्या दोन दिवसांपासून उर्मिला-कंगना वाद सुरू आहे. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर हिने मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱया कंगनाचा चांगलाच समाचार घेतला होता.  तसेच कंगनाला काय प्लस सुरक्षा आमच्या पैशातून का पुरवली, असा सवाल उर्मिलाने केला होता. यामुळे चवताळलेल्या कंगनाने उर्मिलावर वैयक्तिक हल्ला चढवला. ‘उर्मिला मातोंडकर कोण आहे, ती सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. हे ऐकायला बरं वाटत नाही. पण ती आपल्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. हो ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार. कोणालाही तिकिट मिळू शकतं, असं वक्तक्य कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. कंगना पुढे म्हणाली, उर्मिलाची एक अपमानजनक मुलाखत पाहिली. यामध्ये ती माझ्याबद्दल बोलताना दिसत आहे. याची चीड येतेय. तिने माझ्या संघर्षाची थट्टा केली. मला भाजपकडून तिकिट हवंय म्हणून मी असं करत असल्याचे ती म्हणते. मला असं करण्याची काही गरज नाही.

बॉलीवूडचे उर्मिलाला समर्थन

कंगनाने केलेल्या बेताल वक्तव्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींना उर्मिलाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. अनेकांनी उर्मिलाच्या अभिनयाचे, नृत्यकलेचे, सौंदर्याचे कौतुक केलंय.  स्वरा भास्कर, अनुभव सिन्हा, फराह खान अली यांनी ट्विट करत उर्मिलाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रिय उर्मिला मातोंडकरजी, मासूम, चमत्कार, रंगीला, जुदाई, दाउद, सत्या, भूत, कौन, जंगल, प्यार तूने क्या किया, तहजीब, पिंजर, एक हसीना थी… यासारख्या तुमच्या अनेक दमदार कलाकृती आठवतात… तुम्ही तुमचे अभिनय कौशल्य आणि नृत्यकलेला अधिकच सुंदर बनवले आहे. खूप सारे प्रेम.- स्वरा भास्कर, अभिनेत्री

उर्मिलाला समर्थन

तुम्ही महान आहात. माझ्यासारख्या अभिनेत्रीला आणि इंडस्ट्रीत येणाऱया पिढीसाठी तुम्ही आदर्श आहात.पूजा भट्ट, निर्माती

फक्त इतकेच सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वात सुंदर, मोहक आणि एक्सप्रेसिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहात. खूप सारे प्रेम. अनुभ सिन्हा, दिग्दर्शक

कंगनाच्या या बेताल वक्तक्यावर उर्मिलाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण उर्मिलाने रात्री उशिरा ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पोस्ट केला. ‘बदल्याची भावना मानवाला जाळते. संयम हाच बदल्याच्या भावनेला नियंत्रित करू शकतो,’ असं वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या फोटोसोबत लिहिलेलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या