लश्कर-ए-तोएबाचा कमांडर अब्दुल जागतिक दहशतवादी घोषित

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लश्कर-ए-तोएबाचा कमांडर अब्दुल रहमान अल-दाखिल याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये अब्दुलचा हात आहे.

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटनांचा कमांडर राहिलेल्या अब्दुल हा कालांतराने लश्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य झाला. १९९७ ते २००१ मध्ये हिंदुस्थानात लश्कर-ए-तोएबाने केलेल्या हल्ल्यांचे नियोजन अब्दुलने केले होते. मंगळवारी अमेरिकने अब्दुलचे नाव जागतिक दहशवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले.

दहशतवादी अब्दुल याला ब्रिटिश सुरक्षा दलाने २००४ मध्ये इराकमध्ये अटक केली होती. त्यानंतर इराक आणि अफगानिस्तानात अमेरिकेच्या ताब्यात ठेवण्यात आले आणि २०१४ मध्ये त्याला पाकिस्तानकडे सोपवण्यात आले. अटकेत असतानाही तो लश्कर-ए-तोएबाच्या संपर्कात होता आणि त्यांचे काम करू लागला. २०१६ मध्ये जम्मू भागातील लश्कर-ए-तोएबाचा तो कमांडर होता.

Summery – US designates Lashkar e-Taiba’s Abdul Rehman, responsible for attacks on India, as global terrorist