ट्रम्प यांचे जंगी स्वागत: कट्टर इस्लामी दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थान – अमेरिका एकत्र

661

हिंदुस्थान दौऱयावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुजरात येथे अहमदाबाद येथे जंगी स्वागत करण्यात आले. भव्य रोड शो, साबरमती आश्रम येथे भेट आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोटेरा स्टेडियम येथे ‘नमस्ते ट्रम्प’ हा जोरदार कार्यक्रम झाला. या स्वागताने भारावलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुस्थानचे तोंड भरून कौतुक केले. तसेच कट्टर इस्लामी दहशतवादापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असे सांगितले. पाकिस्तानने आपल्या जमिनीवरील दहशतवाद संपवावा, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुश्नर यांचे सोमवारी सकाळी 11.40 च्या सुमारास अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची गळाभेट घेऊन स्वागत केले. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम अशा 22 किलोमीटरच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी उभे होते. 50 ठिकाणी स्टेज उभारण्यात आले होते. तेथे पारंपरिक नृत्य आणि गाण्याचे कार्यक्रम सुरू होते.

ताजमहाल पाहून ट्रम्प भारावले

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प हे ताजमहाल पाहून भारावले. मावळतीचा सूर्य, थंड हवा आणि निसर्गरम्य वातावरण पाहून ट्रम्प ताजमहालाच्या प्रेमात पडले. संपूर्ण ताजमहाल आणि परिसराचा फेरफटका मारला. हे क्षण कॅमेऱयात कैद केले. ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि तिचे पती कुशनर यांनाही ताजमहाल आवडला.

मोदींचे तोंड भरून कौतुक

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 30 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदी माझे जवळचे मित्र आहेत. त्यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. पंतप्रधान मोदींनी चहावाला म्हणून सुरुवात केली. त्यांच्यावर प्रत्येक व्यक्ती प्रेम करते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे असे म्हणत ट्रम्प क्षणभर थांबले आणि त्यांनी मोदींशी हात मिळवला.

साबरमती आश्रमात गांधीजींना विसरले डोनाल्ड ट्रम्प

रोड शोदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पंतप्रधान मोदी यांचा ताफा साबरमती आश्रम येथे दाखल झाला. साबरमती आश्रम येथे ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी चरखा चालवत सूतकताई केली आणि महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. यावेळी व्हिजिटर्स बुकमध्ये राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी प्रतिक्रिया नोंदविली. ‘माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या शानदार दौऱयासाठी आभार’ असे ट्रम्प यांनी लिहिले, मात्र ट्रम्प यांनी महात्मा गांधीजींचा उल्लेख केला नाही.

काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

  • जगातील सर्वात मोठे मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाने आपण भारावून गेलो असे सांगताना ट्रम्प यांनी ‘नमस्ते’ अशी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
  • पंतप्रधान नरेंद्र हे माझे खरे मित्र आहेत. हिंदुस्थानने दाखविलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. हे भव्य स्वागत आयुष्यभर आमच्या लक्षात राहील.
  • यावेळी ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे महान क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. दिलवाले दुल्हनिया ले जाएWगे, शोले या चित्रपटांसह भांगडा डान्सचाही उल्लेख केला.
  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने आपण प्रभावित झालो आहोत.
  • प्रत्येक देशाला आपल्या सीमा सुरक्षित करण्याचा अधिकार आहे. दहशतवादाचा धोका जगाला आहे. अमेरिकेने बगदादीला ठार केले. इसिसचा खात्मा केला. कट्टर इस्लामी दहशतवाद्यांपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी हिंदुस्थान-अमेरिका एकत्र काम करू, असेही ट्रम्प म्हणाले.
  • पाकिस्तानने आपल्या जमिनीवरील दहशतवाद संपवावा. दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने कारवाई केली पाहिजे. अमेरिकी प्रशासन पाकिस्तानबरोबर चर्चा करीत आहे. ही चर्चा सकारात्मक सुरू असून पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करेन अशी अशा असल्याचे ट्रम्प म्हणाले.
  • हिंदुस्थानबरोबर 3 अब्ज डॉलर्सचा करार केला जाईल. संरक्षण करार करताना हिंदुस्थानला अत्याधुनिक लष्करी शस्त्रास्त्रे देऊ. आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहे.

मोटेरा स्टेडियम येथे भव्य कार्यक्रम

  • जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात आले. 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम खचाखच भरले होते.
  • हिंदुस्थान-अमेरिका मैत्रीचे फलक, राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागतासाठीचे ‘नमस्ते ट्रम्प’चे भव्य पोस्टर्स, फलक लावण्यात आले होते. स्टेडियमच्या मध्यभागी आकर्षक फुलांनी सजविलेल्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांचे आगमन होताच टाळय़ांच्या कडकडाटात आणि घोषणांमधून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, अनेक मंत्री, दोन्ही देशांचे राजनैतिक अधिकारी उपस्थित होते.
  • पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला भाषण करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांचे स्वागत केले. गेल्या वर्षी आपल्या अमेरिका दौऱयातील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची आठवण काढली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाल्याचे सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या