ईव्हीएम सोबत छेडछाड शक्य आहे, अमेरिकेच्या शास्त्रज्ञाचा सप्रमाण दावा

सामना ऑनलाईन, मिशिगन

गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप अनेक पक्षांकडून केला जातोय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलंय. निवडणूक आयोग मात्र हे आरोप मान्य करायला तयार नसून त्यांनी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांना आव्हान दिलं आहे की ईव्हीएमसोबत छेडछाड करून निकाल मनाजोगे बदलता येतात हे सिद्ध करा. हिंदुस्थानात सुरू असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञाने छातीठोकपणे दावा केला आहे की ईव्हीएम सोबत छेडछाड शक्य आहे.

j-alex-halderman

जे अलेक्स हल्डरमन नावाच्या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञाने दावा केला आहे की त्याने एक असं उपकरण बनवलं आहे ज्याद्वारे ईव्हीएमसोबत छेडछाड करणं शक्य आहे. या शास्त्रज्ञाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिंदुस्थानातील एका ईव्हीएम मशिनला हे उपकरण जोडून निकाल कसे बदलता येतात हे दाखवल्याचा दावा केला आहे. ईव्हीएमला हे उपकरण जोडल्यानंतर ते मोबाईलवरून नियंत्रित करता येऊ शकतं. मोबाईलच्या मदतीने आपल्याला निकाल बदलता येतात असं हल्डरमन यांचं म्हणणं आहे.

हे निकाल मनोजोगते लावण्यासाठी ईव्हीएम मशिनमध्ये एक मायक्रोप्रोसेसर लावणं गरजेचं असतं, तो लावला की निकाल आपल्याला हवे ते लावता येतात असं बीबीसीशी बोलताना या शास्त्रज्ञाने सांगितलं. याबाबत निवडणूक आयोगाचे आलोक शुक्ला यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे शक्य नाहीये. कारण शास्त्रज्ञांनी जो दावा केला आहे, त्यानुसार त्यांना ईव्हीएम मशिनमध्ये मायक्रोप्रोसेसर किंवा चिप बसवणं गरजेचं असतं. निवडणुकीसाठी जेव्हा ईव्हीएम मशिन आणली जातात तेव्हा ती कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठेवली जातात. त्यावर सीलदेखील लावण्यात येतं. त्यामुळे या ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड केवळ अशक्य आहे असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. २००९ च्या निवडणुकीत १,३६८,४३० ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात आला होता. या सगळ्या ईव्हीएम मशिनमध्ये अशा पद्धतीने चिप लावणं कितपत शक्य आहे असा प्रश्न देखील या शास्त्रज्ञांच्या दाव्यावर उपस्थित करण्यात आला आहे.