पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेणाऱ्या गायिकेचं मणिपूरसंदर्भात ट्विट; पाहा काय म्हणाली

Mary-Millben

आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन हिने गुरुवारी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थन केल्याचं समोर आले आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमी ईशान्य राज्यातील लोकांसाठी लढत राहतील, असा विश्वास देखील तिने यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला उत्तर म्हणून संसदेत केलेल्या भाषणानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मेरी मिलबेन म्हणाली की हिंदुस्थानला आपल्या नेत्यावर विश्वास आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने विरोधकांना लक्ष्य देखील केलं आहे. विरोधक कारणाशिवाय आरडाओरडा करत राहतील, असं म्हणत तिने विरोधकांवर टिका केली. पुढे ती म्हणाली की सत्य ‘लोकांना नेहमीच मुक्त करेल’.

मिलबेननं सांगितलं की, तिला पंतप्रधानांवर विश्वास आहे आणि ती त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. तिने यावेळी अमेरिकन नागरी हक्क चळवळीचे दिवंगत नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या ‘स्वातंत्र्याचा आवाज घुमू द्या’ (Let Freedom Ring) या वाक्याचा उल्लेख केला.

मेरी मिलबेनने ट्विटमध्ये लिहिले, ‘सत्य हिंदुस्थानला आपल्या नेत्यावर विश्वास आहे. हिंदुस्थानच्या मणिपूरच्या माता, मुली आणि महिलांना न्याय मिळेल. आणि पंतप्रधान मोदी नेहमी तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहतील. ‘सत्य हे आहे की, अशा पक्षासोबत जोडणं जो पक्ष सांस्कृतिक वारशाचा अनादर करतो, मुलांना आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाण्याचा अधिकार नाकारतो आणि परदेशात देशाची बदनामी करतो, हे नेतृत्व नाही. हे तत्वशून्य आहे’, असं देखील तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या वर्षी जूनमध्ये मिलबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका दौऱ्यावर भेट घेतली होती. तिने वॉशिंग्टन डीसीच्या रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये हिंदुस्थानचं राष्ट्रगीत गायलं जिथे पंतप्रधान मोदींनी हिंदुस्थानच्या समुदायाला संबोधित केलं. ‘जन गण मन’ म्हणत मेरीनं अभिवादन केलं आणि पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद मागितले होते.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले आणि महिलांविरोधातील गुन्ह्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे ‘आश्वासन’ दिले.