पतीच्या मृत्यूने दु:खी होती शिक्षिका; विद्यार्थ्याने पाठवलेल्या भावनिक पत्राने मिळाले जगण्याचे बळ

आपली जवळील व्यक्ती जग सोडून गेल्याचे दुःख पचवणे सर्वात अवघड असते. या दुःखातून स्वतःला सावरत पुन्हा जीवनाला सुरुवात करणे कठीण होते. अशावेळी मनात निराशा घर करते. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. अशा दुःखातून बाहेर काढणाऱ्यांची आणि या निराशेच्या गर्तेत आशेचा किरण दाखवणाऱ्यांची गरज असते. हेच काम एका विद्यार्थ्याने केले आहे.

अमेरिकेत शिक्षिका असणारी महिला पतीच्या मृत्यूमुळे दुःखात होती. तिला निराशेने ग्रासले होते. तिची जगण्याची इच्छा नव्हती. आपणही पतीसोबत जगाचा निरोप घ्यावा, असे विचार तिच्या मनात सतत येत होते. या काळात तिच्या एका विद्यार्थ्याने तिला भावनिक पत्र लिहिले. त्या पत्रामुळे शिक्षिकेच्या विचारात बदल झाला असून तिला जगण्याचे नवे बळ मिळाले आहे. आता ती नैराश्यातूनही बाहेर आली आहे.

अमेरिकेतील मॅसेच्युएट्समध्ये ही शिक्षका पतीच्या मृत्यूनंतर एकांतवासात राहत होती. ती कोणालाही भेटत नव्हती. याबाबत तिच्या एका विद्यार्थ्याला समजले. त्याने शिक्षिकेला एक भावनिक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिले आहे, ‘प्रिय मिलनर, तुमच्या दुःखाची जाणीव मला आहे. तुम्ही मिस्टर मिलनर यांना बघू शकत नाहीत, त्यांच्याशी बोलू शकत नाहीत. मात्र, तुमच्या हृदयांना जोडणारे रेशीमाचे बंध कायम राहणार आहेत. तुम्ही लवकरच स्वतःला सावरून, या दुःखातून बाहेर याल आणि आम्हांला शिकवण्यास सुरुवात कराल, असा मला विश्वास आहे’, असे त्या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे.

पत्रासोबत विद्यार्थ्याने एक चित्रही शिक्षिकेला पाठवले. त्यात शिक्षिका आकाशाकडे बघत आहे आणि आकाशातील एक रेशीमबंध त्यांच्या हृदयाशी जोडला गेला आहे, असे त्याने चित्रात रेखाटले आहे. या पत्राने ती शिक्षिका भावुक झाली आणि तिला जगण्याचे नवे बळ मिळाले. इतरांनाही अशीच प्रेरणा मिळावी या हेतूने तिने हे पत्र सोशल मिडीयावर शेअर केले आहे. माझ्या एका विद्यार्थ्याच्या या पत्रआमुळे मला जगण्याचे नवे बळ मिळाले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टला 4 लाख लाईक मिळाले असून ते 40 हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आले आहे. हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात. मात्र, शिक्षिकेला पत्र पाठवत तिचे मन जिंकणाऱ्या या विद्यार्थ्यावर सोशल मिडीयात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या