कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकाऱ्यांना प्रवेशबंदी; अमेरिकेचा चीनला दणका

अमेरिका आणि चीनमध्ये तणाव असून आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेने चीनचा आणखी एक दणका दिला आहे. तसेच अमेरिकेतील चीनच्या अधिकाऱ्यांवर देखरेख वाढवली असून त्यांच्यावरील निर्बंध वाढवण्यात आले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी संबधित असणाऱ्या युनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांना व्हिसा देण्यास नकार देण्यात आला आहे. पायउतार होणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने चीनला आणखी एक दणका दिला आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित अधिकारी तसेच चीनच्या विस्तारवादी, दडपशाहीच्या धोरणात सहभागी असलेले अधिकारी आणि चीनच्या युनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटचे अधिकारी यांना अमेरिकेत प्रवेश देणार नसल्याचे अमेरिकेचे पराराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित असलेल्या युनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटवर धमकी देणे आणि हिंसाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे पॉम्पियो यांनी स्पष्ट केले.

उइगर समाज, तिबेटी नागरिक यांच्यावर चीनकडून दडपशाही करण्यात येत आहे. या दडपशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना युनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट ही संघटनेकडून धमकावण्यात येते. तसेच त्यांची खासगी माहिती सार्वजनिक करण्यात येते. अनेकदा अशा व्यक्तींवर संघटनेकडून शारीरिक हिंसचारही करण्यात येतो, असा आरोप आहे. चीनची दडपशाही उघडकीस आणणाऱ्यांविरोधात अशाप्रकारची कारवाई करण्यात येत आहे. अशा लोकांना त्रास देण्यासाठी त्यांची खासगी माहिती सार्वजनिक करण्यात येत आहे.

अशा प्रकारे चीनकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करण्यात येत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे अमेरिका स्वागत करणार नाही. त्यामुळे त्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे पॉम्पियो यांनी सांगितले. तसेच युनाइटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट संघटनेशी संबधित कोणत्याही व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या मुद्दा, कोरोना महामारीचे संकट, व्यापार संघर्ष, चीन-तैवान संघर्ष या मुद्द्यांवरून अमेरिकेने चीनच्या अधिकाऱ्यांवरील निर्बंध वाढवत चीनला दणका दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या