व्हाइट हाऊसमध्ये 24 ऑक्टोबरला दिवाळी

723

हिंदुस्थानात साजरा होणारा दिवाळी हा सण गेल्या दहा वर्षापासून अमेरिकेतही साजरा होत आहे. हिंदुस्थानात यावर्षी 27 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होत आहे. त्या आधी तीन दिवस म्हणजे 24 ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांची ही तिसरी दिवाळी असेल. ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये दिवा लावून या उत्सवाची अधिकृत सुरुवात करणार आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2009 पासून व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरवात केली. त्यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झालेल्या ट्रम्प यांनीही ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. 2017  मध्ये त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये (यूएस प्रेसिडेंट ऑफिस) हिंदुस्थान-अमेरिकन प्रशासनाच्या काही अधिकाऱयांसमवेत दिवा लावून दिवाळी साजरी केली. गेल्या वर्षी त्यांनी हिंदुस्थानचे राजदूत नवतेज सरना यांना व्हाइट हाऊसमध्ये दिवाळीसाठी आमंत्रित केले होते.

गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या टि्वटवरून झाला होता वाद 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त टि्वट केले होते. यामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. संपूर्ण अमेरिकेत आणि जगभरात बौद्ध, शीख आणि जैन समाज सुट्टी साजरा करत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी हिंदूंचा कुठेही उल्लेख केला नसल्याने वाद निर्माण झाला होता.

टेक्सासमध्ये आठवडय़ापूर्वीच दिवाळीस सुरुवात

नेत्यांनी आणि अधिकाऱयांनी आठवडाभरापूर्वीच दिवाळीचा उत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अबॉट यांनी शनिवारी दिवाळीच्या उत्सवास सुरुवात केल्याचे टि्वटमध्ये म्हटले आहे. राज्यपाल बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमास हिंदुस्थानी समुदायास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेक्सास दौऱयाबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. टेक्सासमधील रिपब्लिकन खासदार पीट ओल्सन यांना आमची दिवाळी यावर्षी श्री स्वामीनारायण मंदिरात असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या