अवकाशात इतिहास घडला; महिलांनी केला स्पेसवॉक

409

अंतराळात शुक्रवारी एक नवा इतिहास रचला गेला. क्रिस्टिन्स कोच आणि जेसिका मीर या महिला अंतराळयात्रींनी पुरुषांच्या सहभागाशिवाय अंतराळात भ्रमण करून (स्पेसवॉक) आपला वेगळा ठसा निर्माण केला. असे करून महिलांची ही जोडी पुरुषांच्या मदतीशिवाय स्पेसवॉक करणारी पहिली जोडी ठरली आहे.

या महिलांवर आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरचा तुटलेला बॅटरी चार्जर बदलण्याची मोठी जबाबदारी होती. फक्त महिलांनी स्पेसवॉक करण्यासाठीच्या मिशनला गेल्या मार्च महिन्यात सुरुवात होणार होती; परंतु स्पेस एजन्सीकडे महिला-पुरुष वापरू शकतील अशा कॉम्बिनेशचा एकच मध्यम सूट होता. त्यामुळे मिशन हाती घ्यायला चक्क ऑक्टोबर महिना उजाडावा लागला.

जगभरातून शुभेच्छा
मिशन पूर्ण होताच नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने ट्विट करून या मिशनमधील महिला अंतराळयात्रींना शुभेच्छा दिल्या. तसेच जगभरातील नागरिकांना शुभ संदेश पाठविण्याचे आवाहन केले.

क्रिस्टिना कोच आणि एक पुरुष अंतराळवीराने गेल्या आठवडय़ात स्पेस सेंटरच्या बाहेर पडून नवीन बॅटऱया लावल्या होत्या. त्यावेळीच बॅटरी चार्जर खराब झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी बॅटरी बदलण्याचे सर्व काम स्थगित करून फक्त महिलाच असलेल्या नियोजित स्पेसवॉक मिशनला प्राधान्याने पुढे केले.

बॅटरी बदलण्यासाठी 421वा स्पेसवॉक
गेल्या अर्धशतकात जेवढे स्पेसवॉक झाले ते सगळे पुरुष-महिला अशा दोघांचा समावेश असताना झालेले आहेत. त्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता कालपर्यंत एकूण 420 स्पेसवॉक झालेले आहेत, तर आजचा स्पेसवॉक 421 वा होता. पुरुष अंतराळवीरांना स्पेस सेंटरच्या बाहेर पडू न देताच किंबहुना त्यांनी सोबत न घेताच क्रिस्टिना आणि जेसिका सेंटर बाहेर पडल्या आणि त्यांनी तब्बल साडेपाच तासांच्या मेहनतीनंतर तुटलेला बॅटरी चार्जर बदलण्याची किमया करून दाखविली. या मिशनच्या वेळी फक्त या महिला अंतराळवीर स्पेस सेंटरच्या बाहेर होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या