हिंदुस्थानातील वायू प्रदूषणाला अमेरिका जबाबदार

41

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात दिल्लीसारख्या शहरांनी प्रदुषणाची धोक्याची पातळी गाठलेली आहे. वर्षभरात जवळपास १.१ दशलक्ष हिंदुस्थानींचा हवा प्रदूषणामुळे मृत्यू होतो. देशातल्या नागरिकांचा श्वास गुदमरत असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच हिंदुस्थानाला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत असल्याचं वृत्त येत आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या चौकशी अहवालात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हिंदुस्थान हा इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केलं आहे. परंतु ‘पेटकोक’ प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ केवळ हिंदुस्थानलाच पाठवला जातो. २०१६ मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा पुरवठा हिंदुस्थानला केला आहे. हा पुरवठा २०१० पेक्षा २० पटींनी जास्त आहे. या इंधनाचा वापर हिंदुस्थानातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा हिंदुस्थानला पुरवठा केला जात आहे. हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण पातळीत वाढच होत आहे. गेल्या दशकभरापासून पेटकोक हे इंधन हिंदुस्थानामधील कंपन्यांमध्ये ज्वलनासाठी वापरण्यात येणारे सर्वात महत्त्वाचे इंधन बनले असल्याचे उद्योगांतील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे इंधन टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी वापरण्यात येते. तर, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित वकिलांनी सांगितले की, अमेरिका पर्यावरणाच्या समस्यांना निर्यात करण्याचे काम करत आहे. पेटकोक या अशुद्ध इंधनाचे जगभरात सर्वाधिक उत्पादन घेणारा देशही अमेरिकाच असल्याचे फेडरल अँड इंटरनॅशनलच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

शतकभरापासून अमेरिकेतील उद्योगविश्वासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्प संजीवनी देण्याचे काम करतो. वायव्य इंडियानामध्ये या तेल शुद्धीकरण प्रकल्पांमुळेच तेथील स्टील उद्योग तग धरून होते. तेथे पेटकोक हे स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरले जात होते. पेटकोक हे कोळशापेक्षाही स्वस्त आहे. मात्र तेथील कंपन्या बंद झाल्याने वीजनिर्मितीसाठी याचा वापर होऊ लागला. इतर कंपन्यांनी सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडवर नियंत्रण मिळविण्याची यंत्रणा उभारणे परवडणारे नसल्याने तुलनेने स्वस्त आणि नैसर्गिक वायूच्या वापराकडे आपला लक्ष वळवला. यामुळे शुद्धीकरण प्रकल्पांनी हे उरलेले पेटकोक जगभरातील विकसनशील देशांना विकण्याचा सपाटा लावला. यामध्ये हिंदुस्थानची मागणी मोठी असल्याने ही बाजारपेठ त्यांनी काबीज केली.

आपली प्रतिक्रिया द्या