अमेरिकेत वाघिणीला कोरोना, प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यापासून लागण झाल्याचा संशय

1559

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची लागण आता वाघांनाही झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत वटवाघुळांपासून हा विषाणू संक्रमित होऊन माणसाला त्याची लागण झाल्याचं मानलं जात होतं. पण, आता वाघांमध्येही तो प्रथमच आढळला असून एका चार वर्षांच्या वाघिणीला त्याची लागण झाली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात चार वर्षांच्या मलेशियन वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. नादिया असं वाघिणीचं नाव आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला यूएसडीए नॅशनल वेटरनरी सर्व्हिस लॅबने दुजोरा दिला आहे. तिच्या खेरीज तिची बहीण अजूल, दोन अमूर वाघ आणि तीन आफ्रिकन सिंहानांही कोरड्या खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

अमेरिकेच्या वन्यजीवन संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, या सगळ्या वाघांमध्ये अन्नाचं सेवन कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्यानंतर त्यांना खोकलाही सुरू झाला. जेव्हा परीक्षण केलं गेलं, तेव्हा नादिया हिला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. बाकीच्या प्राण्यांची चाचणी होणं अद्याप बाकी आहे.

ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात यांखेरीज हिमबिबट्या, चित्ता, क्लाउडेड लेपर्ड, अमूर लेपर्ड, पुमा असे अनेक प्राणी आहेत. पण त्यांच्यात अजून तशी लक्षण आढळलेली नाहीत. वन्यजीवन संरक्षण विभागाने प्राणिसंग्रहालयाच्या आतच चाचणी केंद्राची स्थापना केली असून नादियाला संक्रमण नेमकं कसं झालं याचा शोध घेण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या