तणाव शिगेला, अमेरिका-उत्तर कोरिया युद्ध अटळ?

68

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधील वाद आणखी वाढत चालला आहे. अमेरिकेने बंदी घातल्यानंतरही उत्तर कोरियाकडून सातत्याने अणुबॉम्ब आणि आण्विक हल्ला करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचेही जाहीर केले आहे. उत्तर कोरियाच्या या घोषणेनंतर अमेरिकेने कोरियाच्या बेटांजववळून मुद्दाम ध्वनातीत अर्थात सुपरसॉनिक विमानांना काही फेऱ्या मारण्याचे आदेश दिले. बॉम्बवर्षाव करण्याची क्षमता असलेल्या विमानांच्या फेऱ्या करुन अमेरिकेने उत्तर कोरियाला दम देण्याचा प्रयत्न केला.

जपान आणि दक्षिण कोरियासोबत अमेरिकेचे वायुदल कवायत करत आहे. त्यामुळे आदेश मिळताच प्रशांत महासागर परिसरातून (पॅसिफिक) अमेरिकेच्या दोन बी-१ बी लान्सर बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांनी मंगळवारी रात्री उड्डाण केले. या विमानांनी शक्तिप्रदर्शनाचा भाग म्हणून काही फेऱ्या (सॉर्टी) मारल्या. गुआममधून दोन्ही विमानांनी उड्डाण केले होते.

जपान आणि दक्षिण कोरिया या मित्रांसोबत रात्रीच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे युद्ध कवायत करण्याची ही पहिली वेळ आहे. उत्तर कोरिया ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता हा सराव खूप महत्त्वाचा असल्याचे अमेरिकेच्या वायुदलाचे मेजर पॅट्रिक अॅपलगेट यांनी सांगितले.

याआधी उत्तर कोरियाच्या हॅकर्सने दक्षिण कोरियाच्या लष्कराचे संगणक हॅक करून मोठ्या प्रमाणात माहितीची चोरी केली होती. यामध्ये जुने दस्तऐवज, युद्धासाठी तयार केलेले प्लॅन आणि अमेरिकेसोबत असलेल्या संबंधाचे काही दस्तऐवज असल्याचे समोर आले होते. त्यामुळे दक्षिण कोरिया-अमेरिका यांचा तीळपापड झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उत्तर कोरियाला समजले अशा भाषेत (युद्ध) उत्तर देण्याची वेळ आल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या