रेल्वेमार्गालगतच्या भाजीपाल्यासाठी स्वच्छ पाणी वापरा

9

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईच्या बाजारात मिळणारी भाजी नक्की शेतावरची आहे की रेल्वे ट्रकच्या कडेला पिकवलेली असा प्रश्न भाजी विकत घेताना सर्वांनाच पडतो. रेल्वे ट्रकच्या लगतच्या या भाजीसंदर्भातला हाच प्रश्न विधान परिषदेतही विचारला गेला. तेव्हा रेल्वे ट्रकलगतच्या भाजी लागवडीसाठी सांडपाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी कबुलीच राज्य सरकारने लेखी उत्तरात दिली आहे. मात्र यापुढे भाजीपाला लागवडीसाठी स्वच्छ पाणीच वापरले जाईल याची खबरदारी घेऊनच लागवडीसाठी परवानगी द्यावी अशा सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेतून प्रवास करताना कडेला चौकोनी वाफे तयार करून केली जाणारी भाजीची लागवड दिसायला मोहक दिसते, पण या लागवडीसाठी कुठले पाणी वापरत असतील असा प्रश्नही मुंबईकरांच्या मनाला शिवत असतो. रेल्वेमार्गालगत केली जाणारी भाजीपाल्याची लागवड करताना सांडपाण्याचा वापर केला जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, विद्या चव्हाण आदी सदस्यांनी विचारला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे.

आजार होत असल्याचे पुरावे नाहीत
रेल्वेमार्गालगच्या मोकळ्या जागा या रेल्वेच्या मालकीच्या आहेत. त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वेच्या इच्छुक कर्मचाऱ्यांना काही शुल्क आकारून भाजीपाल्याची लागवड करण्याची परवानगी देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून आहे. अशा पद्धतीने लागवड करताना जवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे या लेखी उत्तरात म्हटले आहे. मात्र या पालेभाज्यांमुळे कॅन्सर, डायबेटीस किंवा अन्य घातक रोग होत असल्याचा ठोस पुरावा देणारा कोणताही शास्त्राrय पुरावा पुढे आलेला नाही किंवा तशा स्वरूपाची तक्रारही महापालिकेकडे आलेली नाही असे या लेखी उत्तरात म्हटले आहे. मात्र भाजीपाला लागवडीस स्वच्छ पाणी वापरले जाईल याची खबरदारी घेऊनची अशी परवानगी देण्यात यावी अशा सूचना रेल्वे प्रशासनास देण्यात आल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या