सावधान! सॅनिटायझरचा अतिवापरामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

6455

जगभर धुमाकूळ घालणाऱया कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. मास्क वापरणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता या गोष्टींवर दीर्घकाळासाठी भर द्यावा लागणार आहे. विशेषतः महिला वर्गाचा या स्वच्छतेकडे कटाक्षाने भर असल्याचा दिसून येतो. काही महिला बाजारातून आणलेला भाजीपाला हा पाण्यात सॅनिटायझर टाकून धूत आहेत. परंतु या अतिरेकामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापरही घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना असो अथवा इतर कोणताही सूक्ष्म जीवाणू यापासून स्वरक्षण करण्यासाठी स्वच्छतेला अतिशय महत्त्व आहे. परंतु, सध्याचा कोरोना विषाणूच्या बचावासाठी सर्रासपणे सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. परंतु सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची वाढ रोखली जाते. तसेच, वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने त्वचाविकार उद्धभवू शकतो. खाज येणे, आग होणे, हात लाल पडणे असे आजार होऊ शकतात. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो. त्यामुळे सॅनिटायझरऐवजी शक्यतो साबणाचा वापर करावा. ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी त्याचा वापर करावा. तसेच, 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोलचे प्रमाण असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा, अशी माहिती डॉ. सुचिता लवंगरे देतात.

सध्या अनेक महिला बाजारातून भाज्या आणल्यानंतर पाण्यामध्ये सॅनिटायझर टाकून भाज्या धुतात. परंतु, हे जीवाणू मारण्यासाठी प्रभावी ठरत नाही, तर आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे भाज्या आणल्यानंतर त्या नळाच्या पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात. तसेच, यानंतर भाज्या धुण्यासाठी बेकिंग सोडय़ाचाही वापर करू शकतो. यामुळे शेतात भाज्यांवर मारलेले रासायनिक खत निघून जाते. आपण कायम स्वरूपी याचा वापर करू शकतो. यामुळे कोणतीही हानी होत नाही. विशेषतः तुरटी अधिक प्रभावी ठरते. तुरटीच्या पाण्यात मिनीटभर भाज्या धुतल्याने त्यावरील सर्व जीवाणूंचा नायनाट होतो. तसेच, तुरटीही आरोग्यास हानिकारक नसल्याचे डॉ. लवंगरे सांगतात.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहाता वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छत महत्त्वाची ठरते. सॅनिटायझरच्या वापरापेक्षा साबणाने हात स्वच्छ धुवावेत. तसेच, भाज्या धुताना त्या नळाखाली स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा धुण्यासाठी तुरटी अधिक प्रभावी ठरते. संसर्गजन्य आजारांमध्ये तुरटी अधिक प्रभावी ठरते. तुरटीच्या मिनीटभर पाण्यात भाज्या धुतल्याने त्यावरील सर्व जीवाणू नष्ट होतात. तसेच, आंघोळीच्या पाण्यातही तुरटी लाभदायक ठरते. -डॉ.सुचिता लवंगरे, एमएस, स्त्रीरोग तज्ञ.

आपली प्रतिक्रिया द्या