गडकिल्ल्यांवरील औषधी वनस्पती

819

रतींद्र नाईक, [email protected]

महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला आजच्या काळातही येतो. आयुर्वेदानुसार त्यांनी प्रत्येक गडावर औषधी वनस्पती जाणीवपूर्वक लावल्या होत्या जोपासल्या होत्या

शिवरायांचे आठवावे रुप… शिवरायांचा आठवावा प्रताप…’ असं आपण म्हणतो खरं, पण शिवरायांच्या रायगडवरील दुर्मिळ औषधी वनस्पतींची साधी देखभालही आपण करू शकत नाही अशी स्थिती आहे… शिवरायांनी मिळवलेल्या सर्वच किल्ल्यांना ‘गडकोट’ म्हटलं जातं. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ… गडकोट म्हणजे खजिना… या सगळ्याच गडकिल्ल्यांवर शिवरायांनी नुसत्याच दगड-विटा रचलेल्या नाहीत. त्यावर त्यांनी बऱयाच दुर्मिळ औषधी वनस्पतीही जाणीवपूर्वक लावल्या आहेत. पण आज किल्ल्यांवर लक्ष द्यायला ते स्वतः नाहीत. पण त्यांचा हा वारसा आपण जतन करायला पाहिजे.

आयुर्वेदात ज्या वनस्पतींना महत्त्व देण्यात आलंय अशा असंख्य वनस्पती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर आतापर्यंत होत्या. पण पाण्याच्या दुष्काळामुळे या दुर्मिळ वनस्पती माना टाकू लागल्या आहेत. अलिबाग जिह्यात रायगड किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देऊन शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक होतात. पण त्यांनाही गडावरील औषधी वनस्पती नाहीशा होत असल्याची ना खेद ना खंत…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील १६  हजार औषधी वनस्पतींनी पाण्याअभावी माना टाकल्या. महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले असून या गडकिल्ल्यांवरही निसर्गाच्या वरदहस्तामुळे हिरवळ शाबूत आहे. त्यातही अनेक किल्ल्यांवर औषधी वनस्पती असून आयुर्वेदात या झाडांना महत्त्व आहे. परंतु पाण्याअभावी रायगडावरील औषधी वनस्पतींनी माना टाकल्या. त्यामुळे गडकिल्ल्यांवरील दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

विविध रोगांवर जालिम उपाय ठरणाऱया औषधी वनस्पतींना आयुर्वेदात फारच महत्त्व आहे. आजही अनेक आजारांवर रामबाण इलाज ठरणाऱया या औषधी वनस्पतींची घराबाहेरील परसात अथवा बागेत लागवड केली जाते. ग्रामीण भागात याच औषधी वनस्पती जीवरक्षक ठरत आहेत.

रायगड….शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आवळा, बिबा, उंबर, जांभूळ, निलगिरी आदी औषधी झाडे लावण्यात आली होती. पित्त, केसांची मजबुती, डोळय़ांसाठी उपयुक्त ठरणाऱया आवळय़ाची अनेक झाडे रायगडावर होती. याशिवाय संधिवात, त्वचेच्या विकारांवर इलाज करणारा बिबा, मधुमेहाचे प्रमाण संतुलित ठेवणारा जांभूळ. वेदनेवर तसेच कफावर गुणकारक ठरणारी निलगिरीची झाडे रायगडावर लावण्यात आली होती, मात्र संवर्धनाअभावी या झाडांनी माना टाकल्या.

महिपतगड…सहय़ाद्रीच्याच कुशीत वसलेल्या महिपतगडावर आजही अनेक औषधे झाडे आढळून येतात. गडाच्या डोंगरमाथ्यालगत मिव, कढीपत्त्यासह शिकेकाईची झाडे आढळून येतात. शरीरातील उष्णतादाह कमी करण्यासाठी मिवचा आयुर्वेदात वापर केला जातो. तर जेवणात वापरल्या जाणाऱया कढीपत्त्याचा आयुर्वेदातही उपयोग केला जातो. हृदयविकार, केस गळती यासह त्वचेच्या विकारांवर कढीपत्ता परिणामकारक आहे. ऑनिमियासारख्या आजारावर कढीपत्ता गुणकारक असून येथे मुबलक प्रमाणात त्याची झाडे उपलब्ध आहेत.

प्रचीतगड…संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे असलेला प्रचितगड सहय़ाद्रीचा मुकुटमणी मानला जातो. या गडावर शिकेकाई, बेहडा आदी वनौषधे आढळून येतात. केसांच्या मजबुतीकरिता, केसातील कोंडा दूर करण्यासाठी शिकेकाईचा उपयोग होतो. तर ताप, ज्वर, कफ, पित्त, चरबी हटविण्यासाठी रामबाण इलाज असलेल्या बेहडय़ाची झाडे प्रचीतगडावर आढळतात.

रांगणागड,  सिंधुदुग जिल्हय़ातील कुडाळ तालुक्यात असलेल्या रांगणागडाजवळ लोकवस्ती असून या गडावर रिटा, हळद त्याचप्रमाणे कोरफडची औषधी झाडे आढळत असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी रिटा, जखमेवर इलाज करणारी हळद, त्याचप्रमाणे त्वचेसह विविध आजारांवर उपयोगात आणली जाणारी कोरफडची झाडेही या गडावर आढळतात.

रतनगड…ठाणे जिल्हय़ातील डेणे गावापासून काही अंतरावर असलेल्या रतनगड तसा घनदाट झाडाझुडपांनी नटलेला आहे. गडावर माका, धोतरा, बेलपत्र आदी वृक्ष आढळतात. रतनगडावर माका ही वनस्पती मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचू दंश या रोगांवर प्रभावी ठरते. धोतरा ही वनस्पती विषारी असली तरी त्यापासून अफ्रोपिन नावाचे औषधही तयार केले जाते. बेलपत्र अतिसार, आव, छातीत धडधड आणि उष्णतेवर उपयोगी आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या