आभाळमाया (वैश्विक)…… उपकारक उपग्रह

211

सूर्यमालेतल्या अनेक ग्रहांना एकापेक्षा जास्त नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहेत. गुरू आणि शनी यांच्या चंद्रांची संख्या तर शेकडय़ांत भरते. चंद्र असणे हे ग्रहाच्या दृष्टीने अनेकदा उपकारक ठरतं. अर्थात त्यासाठी त्या उपग्रहाचा आकार तेवढा प्रभावी असायला हवा. आपल्या पृथ्वीच्या बाबतीत चंद्र पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे एकचतुर्थांश आहे आणि त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर इतकं योग्य आहे की त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवरच्या सागरी पाण्यावर परिणाम होऊन भरती-ओहोटीचा खेळ आपल्याला रोज पाहायला मिळतो. पृथ्वीवर चंद्रसूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो.

भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे जलचरसृष्टी उक्रांत होत उभयचर (भू-जलचर) जीव निर्माण झाले. आपल्या चंद्राचा आपल्याला हा मोठा नैसर्गिक फायदा. नंतर त्यावर आधारित कॅलेंडर आणि तिथी आल्यावर दर्यावर्दी लोकांना चंद्राच्या तिथीवरून भरती ओहोटीची अचूक वेळ समजू लागली. पृथ्वी आणि चंद्रातील सरासरी अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. ते कधी सुमारे ५६ हजार किलोमीटरनी कमी-जास्त होत असते. त्यामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या जवळ येतो, तर कधी दूर जातो. चंद्र बऱयापैकी मोठा उपग्रह असल्याने आता तर त्यावर वसाहत करण्याची स्वप्नं पृथ्वीवासी पाहात आहेत.
मंगळाचे फोबो आणि डिमो हे उपग्रह अगदीच छोटे आहेत. गुरूच्या अनेक उपग्रहांपैकी गॅनिनिड, युरोपा, कॉलिस्टा, आयो हे उपग्रह खूप मोठे आहेत, तर शनीचे टायटनसारखे उपग्रहसुद्धा एखाद्या छोटय़ा ग्रहाप्रमाणे आहेत. त्यापैकी कुठे वस्तीयोग्य वातावरण आहे का याचा शोध घेतला जातो.

आता एक बातमी आली आहे ती प्लूटोचा उपग्रह (खरं तर सहग्रह) असलेल्या शेरॉनची २००४ मध्ये प्लूटोचं गृहपद काढून खगोल वैज्ञानिकांनी त्याला खुजा ग्रह म्हटलं. या ‘ड्वार्फ’ ग्रहाचा एकेकाळी उपग्रह मानला गेलेला शेरॉन इतका मोठा आहे की त्या दोघांमधील गुरुत्वीय केंद्र दोघांच्या कक्षेबाहेर येते. याचा अर्थ हे दोन छोटे ग्रह परस्परांभोवती फिरतात असा होतो. त्यामुळे कोण कोणाचा ‘उपग्रह’ हे कसं ठरवणार? हे जोडग्रहच एकमेव आपल्या ग्रहमालेत आहे.

प्लूटो सूर्यापासून बराच दूर असल्याने तिथलं वातावरण अतिशीत, बर्फाळ आहे. मात्र सौरवाऱयांच्या प्रतापामुळे या ग्रहावरच्या वातावरणाची हानी होते. नव्या अभ्यासानुसार लक्षात आलंय की शेरॉन प्लूटोच्या वातावरणाचा ऱहास रोखण्यास मदत करतो. सूर्य आणि प्लूटो यांच्या कक्षांच्या मधोमध असतो तेव्हा सौरवाऱयांपासून प्लूटोचं रक्षण करणारी ‘ढाल’ ठरतो. अर्थात भ्रमंतीच्या कक्षेत केव्हातरी प्लूटोसुद्धा सूर्य आणि शेरॉनच्या मध्ये येतोच. त्यावेळी सौरवाऱयांपासून त्याचं रक्षण करणारं कोणी नसतं.

आपल्या पृथ्वीवर आहे तशी जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी ‘ड्रेक’ यांच्या समीकरणानुसार ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या सूर्यमालेत फक्त आपल्याच वाटय़ाला आल्या असल्याने आपण अस्तित्वात आहोत. समजा आपल्याला सध्या आहे तेवढाच चंद्रासारखा उपग्रह नसता किंवा दोन-चार चंद्र असते, अथवा पृथ्वीचा अक्ष ऋतुचक्र घडविण्याइतका साडेतेवीस अक्षानेच कललेला नसता, चंद्राचं आता आहे तेवढंच अंतर (पृथ्वीपासून) नसतं तरीही आपल्यासकट सभोवताली पाहतो ती सुंदर जीवसृष्टी निर्माण होण्यात अडथळे निर्माण झाले असते. शनी-गुरूसारख्या बलाढय़ ग्रहांनी शेकडो धूमकेतूंपासून आपलं ‘ढाल’ होऊन रक्षण केलं नसतं तरी आपलं ‘असणं’ घडलं असतं की नाही शंकाच आहे. एकूणच वैश्विक उलाढालीतला एक विलक्षण योगायोग म्हणजे पृथ्वी-चंद्र जोडी. त्याची आपल्याला कल्पना आली आहे. मात्र आपलं दुर्मिळ अस्तित्व जपण्यासाठी पृथ्वीवरचा ‘बुद्धिमान’ प्राणी फार काही करताना दिसत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या