कैदीही म्हणाले ‘व्वा उस्ताद…’

31

बंदीवानांनी अनुभवली तबल्याची जादू

ब्रिजमोहन पाटील । पुणे

चपळाईने तबल्यावर फिरणारी बोटे …त्यातून निघणारा मधुरू ताल… मंत्रमुग्ध झालेले हजारो कैदी…अन योग्य वेळी मिळणारी भरभरून दाद… अशा उत्साही वातावरणात जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी येरवडा कारागृहातील बंदीवानांसमोर वादन केले. ‘याची देही याची डोळा’ अशा या ऐतिहासिक क्षणामुळे कारागृहातील परिसर आनंदाने प्रफुल्लीत झाला.

निमित्त होते, महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळाच्यावतीने कैद्यांसाठी आयोजित केलेल्या ‘प्रेरणापथ’ उपक्रमाचे. यात आज उस्ताद झाकीर हुसैन यांनी कैद्यांशी संवाद साधला. कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण कारागृह अधिक्षक यु. टी. पवार, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप यावेळी उपस्थित होते.

तबल्याचे ताल कैद्यांना समजावून सांगत वादनास सुरूवात केली. त्यामध्ये पाहुण्यांचे स्वागत, धावणारी रेल्वे, शंख व डमरू यांचा एकत्रीत आवाज तबल्यावर तालातून वाजवून दाखवला. यावेळी टाळ्यांच्या ठेक्यात कैद्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

उत्साद झाकीर हुसैन म्हणाले, कारागृहात आले म्हणले जीवन संपले असे नाही. चुकीचा मार्ग बदलून नवी दिशेने आयुष्य जगले पाहिजे. यावेळी कारागृहात तबला वादन करणार आहे. पण पुढच्या वेळी तुमची भेट ही मुंबई, पुण्यातील सभागृहात कार्यक्रमाच्या दरम्यान व्हावी.

कारागृहाच्या भिंतीबाहरे मी तुमची वाट पहातोय. तबला वादनास कैद्यांनी दिलेला प्रतिसाद हा सवाईगंधर्व किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रेक्षकांप्रमाणेच भरभरून आहे.

वर्दीला उस्तादजींची शाब्बासकी

कारागृहातील महिला तरूंग अधिकारी तेजश्री पोवार या तबला वाजवतात कळाल्यावर झाकीर हुसैने यांनी पोवार यांना व्यावपीठावर बोलावून घेतले. पोवार यांनी चार-पाच ताल खणखणीत वाजवले, त्यात उस्तादजी सुद्धा तल्लीन झाले. वर्दीतील या कालाकाराचे त्यांनी भरभरून कौतुक केले. तेजश्री पोवार म्हणाल्या, लहापणीच तबलावादन शिकले. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरला झाकीर हुसैन यांच्या कार्यक्रमाची तिकीटे मिळविण्याचा प्रयत्न केला होता, पण आज प्रयत्यक्षात त्यांच्या शेजारी बसून तबलावादन केले हा माझ्या आयुष्यातील क्षण आहे. कारागृहातील एका कैद्याने महमंद रफी यांचे ‘चाहूंगा मै तुझे सांझ सबेरे फिर कभी अब नाम को तेरे आवाज मै न दुंगा’ हे गाणे सादर केले. त्यासही उत्साद हुसैन यांनी दाद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या