रेल्वेच्या निष्काळजीपणामुळेच घडली उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना

17

सामना ऑनलाईन। मुजफ्फरनगर

रेल्वेच्या निष्काळजीपणामुळेच उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या मार्गावरून उत्कल एक्स्प्रेस जाणार होती त्याच मार्गावर रुळ दुरुस्तीचे काम सुरू होते. पण त्यासंबंधीच्या आवश्यक सूचना चालकापर्यंत पोहचल्या नाहीत. यामुळेच एक्स्प्रेस रुळावरून घसरली व हा अपघात झाला. यात २३ ठार व ९७ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

शनिवारी पुरी-हरिव्दार उत्कल एक्स्प्रेस नवी दिल्लीहून हरिव्दारकडे जात असताना उत्तर प्रदेशातील खतौनीजवळ घसरली. वेगात असलेल्या या ट्रेनचे अनेक डबे घसरताच दुसऱ्या डब्यांवर चढले तर काही डबे रुळाशेजारील शाळा व घरात घुसले. त्यानंतर गॅस कटरने डबे कापण्यात आले व आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले. प्राथमिक पाहणीत हा घातपाताचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मात्र घटनास्थळावर आढळलेल्या रुळ दुरुस्तीच्या साहित्यावरून रेल्वेच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या मार्गावर ही दुर्घटना घडली त्या मार्गावर रुळ दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे या मार्गावरून जाताना गाडीचा वेग कमी ठेवण्याचा आदेश चालकाला दिला गेला होता. पण ऐनवेळी सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची सूचना चालकापर्यत पोहचलीच नाही. यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ताशी १०० किमी वेगाने चालकाने रेल्वे रुळावरून नेली व ती घसरली.

यास उत्तर प्रदेशचे मुख्य गृह सचिव अरविंद कुमार यांनीही दुजोरा दिला असून रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम सुरू असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला, यामुळेच हा अपघात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या