उत्सवांचा महिना

223

मीना आंबेरकर

फाल्गुन… उत्सवांचा महिना… वसंताचा सोहळा… होळीव्यतिरिक्त अजूनही बरेच काही असते या महिन्यात.

आपल्या मराठी वर्षाचा फाल्गुन हा शेवटचा महिना. दोन महत्त्वाच्या घटना या महिन्याचे वैशिष्टय़. या दोन्ही घटना शक्यतो हातात हात घालूनच आपल्या भेटीस येतात. तसं पाहिलं तर बारा मास आणि सहा ऋतूंचे सोहळे साजरे करताना दिवस कसे सरतात हे समजत नाही, पण शेवटच्या महिन्यातील हा शेवटचा ऋतू आपल्या सगळय़ांनाच हवाहवासा असतो. बदलत्या ऋतुपर्वात येणाऱया या महिन्याला वसंतोत्सवाचा महिना म्हणून ओळखले जाते. एकीकडे सरती थंडी… हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल ऐन भरातला वसंत सृष्टिसौंदर्याचा अनुपम सोहळा मांडतो. तसेच धार्मिकतेतूनही या महिन्याचे पावित्र्य वेगळे ठरते.

फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातील शेवटचा महिना. या महिन्याला पूर्वी ‘तपस्य’ या नावाने ओळखत असत. या महिन्यात दररोज रात्रीच्या प्रारंभी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वेला उगवते तसेच या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला फाल्गुन हे नाव प्राप्त झाले.

या महिन्यात उन्हाळय़ाची चाहूल लागलेली असते. वर्ष संपत आल्याची जाणीव होत असते. अर्थात आपली वर्षअखेर डिसेंबरमध्येच झालेली असते. परंतु आपले सणवार आपल्याला मराठी वर्षे अखेरीची त्याचबरोबर मराठी वर्षाची जाणीव करून देतच असतात. तसे पाहिले तर सर्व महत्त्वाचे सणवार अगोदरच संपलेले असतात. परंतु होलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. उष्णतेची तीक्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचे हे केलेलं पूजन. वर्षभरातील सणांचे हे भरतवाक्यच असते.

हा होलिकोत्सव म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा नाश. या वर्षातील सर्व जुनेपाने, वाईट अनुभव, वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायच्या, भस्मसात करायच्या असाही दृष्टिकोन या सणाच्या बाबतीत ठेवायला हरकत नाही. संपूर्ण वर्षातील चांगले जतन करायचे व वाईटाची आहुती द्यायची. आलेल्या वर्षात कितीतरी गोष्टी अशा असतात की त्याचा आपल्याला मनस्ताप झालेला असतो. नकोशा वाटणाऱया गोष्टी घडलेल्या असतात. काही गैरसमजाने घडलेल्या तर काही जाणून बुजून घडविल्या गेलेल्या असतात. काही गोष्टींबद्दल मनात संताप असतो, राग असतो, अढी असते. ते जर तसेच जपत राहिले तर आपली पुढील वाटचाल सुखकर कशी होणार? स्वच्छ मनाने नवीन वर्षाचे स्वागत कसे होणार? काही प्रसंगाने एकमेकांची दुरावलेली मने, दुरावलेली मैत्री पूर्ववत करण्यासाठीच होलिकोत्सवाची गरज असते. होळी म्हणजे प्रज्वलित अग्नी. हा अग्नी सर्व वाईट आत्मसात करतो व त्यांचा नाश करतो. अशुद्ध वातावरण शुद्ध करतो. प्रदूषण नाहीसे करतो.

तसेच होळी हा रंगोत्सवही समजला जातो. माणसाच्या मनात जसे सौंदर्याला स्थान असते तसेच कुरुपालाही असते. रोजच्या सभ्यतेला फाटा देऊन मनातल्या वेडय़ाविद्रय़ा कुरुपतेचेही प्रकटीकरण आवश्यक असते. रोजच्या चाकोरीबद्ध सभ्यतेला टाळून नीतीनियम झुगारून देऊन मनाला मोकळीक देण्यासाठी धुळवड साजरी केली जाते. त्यात मनात साचलेल्या सर्व वाईट, असभ्य, अश्लील गोष्टींचा निचरा होतो व मनाची पाटी स्वच्छ होऊन पुन्हा एकदा सभ्यतेच्या चौकटीत बसण्यासाठी सज्ज होते. मनातल्या अस्वच्छतेची धूळ झटकली जाते. ज्या गोष्टी आपण रोजच्या जीवनात करणे शक्य नसते ते करायला, तसे वागायला या धुळवडीच्या निमित्ताने जाणीवपूर्वक मोकळीक मिळते व ते आवश्यकही असते. जणू काही त्यासाठीच शेवटच्या महिन्यातील हा शेवटचा सण राखून ठेवलेला असतो.

हिंदुस्थानातील विविध भागातील पूजा

या महिन्यात हिंदुस्थानच्या विविध भागांत वेगवेगळे महोत्सव आयोजित होत असतात. देवळांमध्ये फाल्गुन मासानिमित्त पूजा-अर्चना संपन्न होतात. फाल्गुन शुक्ल अष्टमीला लक्ष्मीची म्हणजेच सीतेची पूजा केली जाते. फाल्गुनी पौर्णिमेला फाल्गुन नक्षत्र असेल तर हा दिवस विशेष शुभ मानला जातो. या दिवशी भाविक पलंग किंवा बिछाना दान देतात. यामुळे चांगली पत्नी मिळते असा समज आहे.

‘उत्तिर’ महोत्सव

दक्षिण हिंदुस्थानात फाल्गुन पौर्णिमेला ‘उत्तिर’ नामक महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा मंदिरोत्सव हे या महिन्यातील प्रमुख आकर्षण असतं.

दानधर्म

या महिन्यात विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, गाय, कृष्णाजिन, वस्त्र्ा यांचे दान देण्याची प्रथा आहे. स्कंद पुराणात पुरुषांनी या काळात एकभुक्त राहावे असे सांगितले आहे.

‘दोलायात्रा’

या महिन्यात बंगालमध्ये ‘दोलायात्रा’ असते. फल्गू म्हणजे गुलाल. तो कृष्णमूर्तीवर उधळून होळी खेळतात. उत्तर प्रदेशात लाल-पिवळी वस्त्र परिधान करून टिपऱया खेळतात. आपल्याकडे आंबा, केळी, माड, पोफळी, एरंड यांची होळी उभारतात. गोव्यात होळी केवळ उभी करतात.

आपली प्रतिक्रिया द्या