रविवारची भेट – ‘तो’ सध्या काय करतो…

354

<< भक्ती चपळगावकर >>

ती सध्या काय करतेय, असा प्रश्न त्याने विचारला आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर जो तो आपापल्या पद्धतीनं शोधू लागला. लग्न-संसारात रमलेल्या ‘तिला’ आणि ‘त्याला’ जुने दिवस आता आठवायला लागलेत. जुन्या फोन डायऱ्या काढून फोन करावा का? या विचारात अनेक जण आहेत. साऱ्या महाराष्ट्राला आपल्या गुलाबी भूतकाळात नेणाऱ्या सतीश राजवाडेची घेतलेली ही भेट.

सध्या रोज सकाळी व्हॉट्स ऍपमध्ये एक नवा मेसेज ‘ती सध्या काय करतेय?’ या प्रश्नाचं उत्तर देत असतो. पण आजचे प्रश्न मी एक ‘तिच्या’ भूमिकेतून विचारणार आहे आणि तू ‘त्याच्या’ भूमिकेतून उत्तरं दे. तर ‘तो काय करतोय’ हे तू सिनेमात दाखवलंस, तरी तिला पडणारे कित्येक प्रश्न तिने विचारलेच नाहीत. ही सगळी त्याचीच स्टोरी आहे का?
– हा प्रश्न ऐकून माझी बायको जाम खूश होणार आहे. तो सध्या काय करतोय हा तुला प्रश्न पडलाय म्हणजे, भाग दोनसाठी वाव आहे, असं तिला वाटेल. अर्थात तसं माझ्या डोक्यात नाहीए. तू जर माझं आतापर्यंतच काम बघितलंस तर तुझ्या लक्षात येईल की माझ्या प्रत्येक सीरियल, सिनेमामध्ये स्त्री केंद्रस्थानी आहे. मी पूर्णपणे किचन पॉलिटिक्सच्या विरोधात आहे. स्त्री किती बिचारी आणि कमजोर आहे, असं दाखवण्याच्या मी अगदी विरोधात आहे. नायकाशेजारची बाहुली म्हणून तिचा वापर करण्याच्या मी सपशेल विरोधात आहे. प्रेमाची गोष्ट, असंभव, गुंतता हृदय हे, मुंबई-पुणे-मुंबई काहीही घे, त्यातली स्त्री कणखर आहे. तू मला स्त्रीच्या भूमिकेतून प्रश्न विचारत आहेस, म्हणून मी तुला male perspectiveनी सांगतो की, स्त्री मला कथाविषय देते. जेव्हा मानवी नाते संबंधाचा विषय निघतो, तेव्हा मला पुरुषांना काय वाटतं हे महत्त्वाचं वाटत नाही. कारण स्त्री कोणत्याही नात्याला विविध रंग देते. आता जेव्हा मी माझ्या सिनेमाचं शीर्षक – ‘ती सध्या काय करते?’ असं ठेवतो तेव्हा नक्कीच हा प्रश्न पुरुषाने विचारला आहे, पण ‘तिला’ केंद्रस्थानी ठेवून. जेव्हा जेव्हा मी मित्रांना भेटतो तेव्हा नेहमी चर्चा सुरू होते ती- ‘अरे हा काय करतोय, तो काय करतोय’ पासून. पण मध्येच ‘ती काय करतेय रे?’ असा प्रश्न निघतोच. त्यामुळे मी जर एक स्त्री असलो असतो तर कदाचित- ‘तो काय करतोय?’ हा प्रश्न मला पडला असता. जेव्हा सिनेमाच्या शेवटी ती म्हणते ना की, याचसाठी मी आज इथे आले. म्हणजे तिने या प्रश्नावर विरामचिन्ह लावलंय. त्यामुळे दोघांमधला बॅलेंस साधला गेलाय. जर तसं झालं नसतं आणि कथेचा शेवटही नायकानेच केला असता तर मुलीला मुलापेक्षा कमी महत्त्व मिळाले असते.
मला वाटतं की बायका जात्याच एकाचाच विचार करतात तर पुरुष एकीचाच विचार करत नाहीत. हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागायचंच का?
– (हसतो.) आज हाच मेसेज फिरतोय की ‘ती काय करतेय’ याचा विचार करता करता, आहे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका नाही तर घरात दंगल होईल. आता तुझ्या प्रश्नाकडे वळतो, तू जे म्हणतेस त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या एका चित्रपटात, बदामराणी गुलामचोर – मध्ये एक वाक्य आहे – कोणताही मुलगा आणि मुलगी भेटले तर त्यांच्या मनात एक प्रश्न पडतोच, की माझं याच्या बरोबर लग्न झालं तर? हा विचार डोक्यात येतोच. त्यामुळे पुरुष अनेक जणींच्या मागे लागतात किंवा स्त्रिया तशा नसतात हा पूर्वग्रह ठेवायचाच कशाला? प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष – दोघांचंही एकसारखं भावविश्व असतं, त्या दोघेही एकसारख्या भावना अनुभवतात.
आता तू म्हणतोयस स्त्री आणि पुरुषांच्या प्रवृत्ती सारख्या असतात, पण आता ऊर्मिलाची भूमिका असो वा तेजश्रीची. त्या दोघींच्याही भूमिकांत एक समंजसपणा आहे. ऊर्मिला ज्या सहजपणे नवऱ्याचा भूतकाळ किवा रिलेशनशिप ज्या सहजतेने स्वीकारते, त्या सहजतेने अंकुशचं कॅरेक्टर ते स्वीकारेल का, आता हे आम्हाला कळायचा काही मार्ग नाही.
– माझ्या नायकाला नेहमीच एका भीतीनं पछाडलंय, ते म्हणजे मी हिला विचारलं, हिनं नाही म्हटलं तर मी हिला नेहमीसाठी गमावून बसेन आणि याच भीतीतून मग तो इतर जणींकडे वळतो. त्यातूनच काही वेड्या चुका होतात. त्या दोघांमध्ये मोठ्ठं भांडण मी दाखवलंच नाहीए. कारण ते तसं जर झालं असतं ना तर मग त्यांच्या गोष्टीवर कायमचा पडदा पडला असता. या वयात जे भांडण होतं ना, ते फार जिव्हारी लागतं. आता ऊर्मिला आणि तेजश्री मी समंजस दाखवल्या आहेत. कारण मला नेहमीच वाटतं की जगात कोणी वाईट नाहीच आहे मुळी. त्यामुळे माझ्या सिनेमात तुला वाईट माणसं दिसणार नाहीत. म्हणजे मला ऊर्मिला पण चिडवायची, अरे अशी कशी ही बायको, कोणती बाई आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणीचं असं स्वागत करील? उलट मी म्हणीन – निघ (आम्ही दोघेही हसतो).
मग तुझ्या बायकोचं काय मत होतं? म्हणजे तुझी भूतकाळातली एखादी जवळची मैत्रीण तुला भेटायला आली तर…
why not? लग्नापूर्वी माझी एक गर्लफ्रेंड तिची मैत्रीण होती. कधी कधी आजही ती मला चिडवते. त्यामुळे आयुष्यभर आपण जे नातं निभावतो, त्या नात्यात मोकळेपणा असायलाच हवा नं? अगं मला अनेक फोन कॉल्स आले, अनेकांनी सांगितलं की, ‘तन्वी-अनुराग देशपांडे’चा सीन बघून आम्हाला रडू आलं तर कित्येकांनी सांगितलं की, शेवटी जसं अनुराग आणि तन्वीतल्या अव्यक्त भावनेला विराम मिळाला, तसा विराम आमच्या भूतकाळालाही मिळाला. असं ऐकलं की मला वाटतं की ज्या उद्देशानं मी हा सिनेमा केला, तो उद्देश सफल झाला. मला वाटलं होतं की हा सिनेमा बघून लोकांनी मोबाईलवर निदान एवढा मेसेज तरी पाठवायचा, ‘हाय, कशी आहेस, काही नाही सहज आठवण आली म्हणून मेसेज केला.’ जर एखादं नातं अपूर्ण राहिलं की त्यात एक कडवटपणा येतो, तो कडवटपणा संपणं फार महत्त्वाचं असतं. हाच या सिनेमाचा उद्देश आहे. शेवटी आयुष्य किती छोटं आहे, उद्या काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तो क्षण किती सुंदर असतो. त्यात कडवटपणा येणं बरोबर नाही.
मग पुरुष त्यांचा भूतकाळ म्हणा किंवा अशी काही नाजूक नाती लपवून का ठेवतात? जुन्या मैत्रिणीला भेटायला जायचंय तर जा ना, बायकोपासून का लपवायचं? असेच पुरुष असतात ना?
– नाही नाही, पुरुष असेच असतात असं नाही. सिनेमात थोडी विनोदाची पखरण हवी ना, म्हणून हे प्रसंग आहेत. त्यामुळे ते प्रेक्षकांना गुदगुल्या करण्यासाठी निर्माण झालेले प्रसंग आहेत. खरं तर प्रत्येकाला असं करायचं असतं, पण ते करत नाहीत आणि जेव्हा आपण मोठय़ा पडद्यावर त्याला असं वागताना बघतो तेव्हा मग प्रतिक्रिया व्यक्त होते की, बघा मी सांगितलं होतं ना, हे लोक असेच असतात. हीच या सिनेमाची गंमत आहे.
खरं तर घरातून बाहेर पडतानाच मैत्रिणीच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घालून बाहेर पडायचं ना…
– मग बायको कशी विचारणार – सकाळी जाताना तर वेगळा शर्ट घातला होता ना. कित्येक जणांच्या आयुष्यात असे प्रसंग घडतात, जेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आता काय सांगू? (आम्ही दोघेही हसतो). तो खोटं बोलतोय पण तो कुणाला दुखावण्याचा उद्देशानं खोटं बोलत नाही. त्याला फक्त तिला भेटायचंय. बरं नवराबायकोत काहीही तणाव नाहीत, त्याची बायको सुंदर आहे. मुद्दाम त्याचा संसार सुखाचा नाही, असं मी दाखवलं नाही. ज्या सीनमध्ये त्याची आई, त्याची बायको, मैत्रीण आणि मुलगी आहे त्यात प्रत्येकीच्या चेहऱयावर एक वेगळाच भाव आहे. अगदी आईच्या चेहऱयावरसुद्धा एक स्माईल आहे, कारण तिच्या मनातही कुठेतरी ही जाणीव आहे की, असं असतं आयुष्यात कधी कधी त्यामुळे तू जे म्हणतीएस की सांगून का घराबाहेर पडायचं नाही, तर त्याला फक्त तिला भेटायचंय, त्याचं चालू असलेलं आयुष्य त्याला डिस्टर्ब करायचं नाही.
‘ती सध्या काय करतेय’, हेच टायटल मनात होतं की..
– हे शीर्षक लोकप्रिय होईल याची खात्री होती, कारण प्रत्येकाला पडणारा तो प्रश्न आहे. पण हे इतकं व्हायरल होईल याची कल्पना नव्हती. मला वाटतं हेच सिनेमाचं यश पण आहे.
तुझ्या सिनेमात मानवी नातेसंबंध खूप ठळक दिसतात, पण अशा सिनेमांना दरवेळी प्रेक्षक स्वीकारेलच असं नाही ना. मला हे करायचंय असाच विचार त्यामागे असतो की काही प्रेक्षकांचाही असतो?
– मला हे करायचंय हा पहिला विचार असतोच पण त्याचबरोबर मी फारशी रिस्क घेत नाही असं मला वाटतं. मराठी रसिक प्रेक्षकांनी वेळोवेळी मला हेच सांगितलंय की त्यांना हे सिनेमे आवडतात. स्त्रियांना काही कळत नाही अशा समजातून ज्या भूमिका तयार होतात, त्या भूमिकांचा प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. जर मी पडद्यावर स्त्रीला बुद्धीहीन दाखवले तर मी समाजाला पुढे न नेता मागे नेईन. मला अशा प्रकारचा सिनेमा बनवायचा नाही. मला असं वाटतं की मानवी नातेसंबंध हा आयुष्यातला सगळ्यात मोठा ड्रामा वाटतो. जनरली कट कारस्थानाच्या पुढे कथा सरकत नाही. मी ऋषिकेश मुखर्जींचा फार मोठा चाहता आहे. जेव्हा मी खूबसुरत, गोलमाल, चुपके चुपके, मिली, गुड्डी बघतो’ तेव्हा लक्षात येतं की या साऱ्या सिनेमांत कुठेच बटबटीतपणा नाही. असंभवसारख्या सिरियलनंतर मला लोक थ्रीलर स्पेशालिस्ट म्हणत होते. जितक्या सहज गोष्ट सांगून लोकांना पटते ना, त्याची गंमतच काही और आहे. lovestoris are foever. प्रेमकथांना कितीतरी कंगोरे असतात, ते धुंडाळून मी प्रेमकथा सांगतच राहणार.

आपली प्रतिक्रिया द्या