उत्तर प्रदेश- लव्ह जिहाद विरोधी कायद्यांतर्गत पहिली तक्रार दाखल

उत्तर प्रदेशात बेकायदेशीर पद्धतीने धर्मपरिवर्तनाला विरोद करणारा कायदा नुकताच पारित करण्यात आला आहे. या कायद्यान्वये बरेली येथे पहिली तक्रार दाखल झाल्याचं वृत्त आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील देवरनिया येथे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील एका तरुणाविरुद्ध महिलेला फूस लावून तिचं धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी धर्म परिवर्तन विरोधी अधिनियम 3/5 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार, उबैस नावाच्या तरुणावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा तसंच फूस लावून धर्म परिवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उबैस सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशात कथित लव्ह जिहाद प्रकरणांविरोधात योगी आदित्यनाथ सरकारच्या अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली. या नंतर राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू झाला.

या कायद्यानुसार, जबरदस्ती करुन, आमिष दाखवून केलं गेलेलं धर्म परिवर्तन हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल. या कायद्याच्या उल्लंघनाने कमीतकमी 15 हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. तेच जर अल्पवयीन अथवा अनुसूचित जाती-जमतीच्या मुलीसोबत केल्यास कमीतकमी 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होईल.

बेकायदेशीर सामूहिक धर्म परिवर्तनासाठी कमीतकमी 50 हजार रुपये दंड आणि 3 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. धर्म परिवर्तनासाठी एक फॉर्म भरून दोन महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांना देणे अनिवार्य आहे. त्याचे उल्लंघन केल्यास 6 महिन्यापासून ते 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि कमीतकमी 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या