उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी

39

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये २०१२च्या विधानसभा निवडणुकीत ४७ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजप मुसंडी मारली आणि अखिलेश यादव-राहुल गांधी या जोडगोळीला जेमतेम ६०-६५ जागांवर मजल मारणे जमले आहे. सप-काँग्रेस आघाडीला निकाल येऊ लागताच मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षासाठी तर हा मोठा हादरा आहे.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवण्याची खेळी यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.आतापर्यंत हाती आलेले कल पाहता यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मुस्लिम, दलित, ओबीसी आणि यादव समाजाकडून इतर पक्षांच्या तुलनेत जास्त पाठिंबा मिळाला आहे. समाजवादी पक्षाशी संबंधित यादवांच्या वर्चस्वाला कंटाळून लोकांनी भाजपला मते दिली. कुर्मी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अपना दलशी लोकसभा निवडणुकीपासून भाजपने हातमिळवणी केली आहे. अपना दलचे संस्थापक दिवंगत सोनेलाल पटेल यांची मुलगी अनुप्रिया यांना केंद्रात आरोग्य राज्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपला लाभदायी ठरला आहे.

जातीपातींचे समीकरण व्यवस्थित समजून घेऊन राजकीय डाव मांडणाऱ्या भाजपने वाराणसीत पंतप्रधानांचे सलग ३ दिवस रोड शो केले. प्रचारसभांचा धडाका, मंदिर आणि आश्रमांना भेटी देत पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अखेरचे ३ दिवस प्रसारमाध्यमांचे सगळे लक्ष स्वतःकडे आकर्षित करुन घेतले. वेगवेगळ्या खेळी करुन सतत चर्चेत राहणे भाजपसाठी हिताचे ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या