उत्तर प्रदेशात कव्वालीच्या नावाखाली धर्मांतरणाचा डाव, 18 जणांना अटक

उत्तर प्रदेशमधील आझमगढ येथे पोलिसांनी धर्मांतरण करवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. धार्मिक प्रवचन आणि कव्वाली आयोजनाच्या नावाखाली लोकांचं धर्मांतरण करण्यासाठी मतपरिवर्तन केलं जात होतं, असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सिकंदर नावाच्या या टोळीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या टोळीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी देवगाव तालुक्यातील चिरकीहित गावात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर येथे कव्वालीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इस्लाम धर्माची स्तुती करून हिंदू धर्म तसंच परंपरांवर टीका करून धर्मांतरण करण्यासाठी प्रभाव टाकण्यात येत होता. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यक्रमस्थळी धाड टाकली.

आझमगढचे पोलीस अधीक्षक अनुराग आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी हा कार्यक्रम पार पडला. जेव्हा पोलिसांची धाड पडली तेव्हा कव्वाली आणि प्रवचनाचं सत्र सुरू होतं. या दरम्यान खूप गर्दी झाल्याने अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आलं. यावेळी आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर बेकायदेशीर मार्गाने धर्मपरिवर्तन विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जर यात आरोपी दोषी आढळले तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच, या कार्यक्रमात सिकंदर आणि अन्य आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी धर्मांतरण करण्यासाठी या कार्यक्रमात लोकांना प्रभावित करत असल्याचं तसंच त्यासाठी आपल्याला पैसेही मिळाल्याचं कबूल केल आहे.

अशा प्रकारचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या टोळीचा प्रमुख सिकंदर हा मैनपूर गावचा रहिवासी आहे. तो आजार बरे करण्याच्या निमित्ताने लोकांना प्रलोभनं देऊन धर्मांतरण करवत होता. त्यासाठी त्याने टोळी बनवली होती. ही टोळी प्रवचनासारखे कार्यक्रम आयोजित करून त्यात धर्मांतरणासाठी प्रभावित करण्याचं काम करत होती. या प्रकरणी 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याखेरीज 7 त्रिशूळ, मुस्लीम धर्मगुरूंचे फोटो, बाज्याची पेटी, साऊंड बॉक्स, गाडी, बुलेट, टेम्पो आणि जनरेटर हे साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.