आरोपी जामिनावर सुटला, बलात्कार पिडीतेला आईसह ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

murder

4 वर्षांपूर्वी 13 वर्षांच्या मुलीवर 3 जणांनी बलात्कार केला होता. या प्रकरणातील एका आरोपीने जामिनावर सुटताच या मुलीसह तिच्या आईला ट्रॅक्टरखाली चिरडून मारल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडलेला आहे. ही घटना कासगंजमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला पुन्हा अटक केली आहे.

पोलीस अधीक्षकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की पीडीत मुलगी आणि आरोपी यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून वाद होता. पीडितेच्या वडिलांचा आरोपीच्या वडिलांसोबत पैशांवरून वाद झाला होता. या वादामध्ये आरोपीच्या पित्याची हत्या करण्यात आली होती. याचा बदला घेण्यासाठी आरोपीने 13 वर्षांच्या मुलीचे अपहरण केले होते. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुलीने आपल्यावर 3 जणांनी बलात्कार केल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली होती.

जामिनावर सुटल्यानंतर आरोपी मंगळवारी ट्रॅक्टर घेऊन पीडित मुलीच्या शोधात निघाला होता. ही मुलगी आईसोबत बाजारात गेली होती. आरोपीने या दोघींना शोधून काढलं आणि बाजारातून परतत असताना चिरडून ठार मारलं. दोघींचा खून केल्यानंतर आरोपी ट्रॅक्टर सोडून तिथून पळून गेला होता. हा खून आरोपीने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि बलात्काराच्या आरोपातून सुटका व्हावी यासाठी केला असल्याचा पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. या दुहेरी हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. पोलिसांनी कशीबशी समजूत काढत या लोकांना रस्त्यातून बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या