यूपीत ‘राम राज्य’ नाही, ‘नथुराम राज’! वाळूमाफियाच्या एनकाउंटरवर अखिलेश यांची टीका

492

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ‘राम राज्य’ नव्हे ,तर ‘नथुराम राज’ सुरु आहे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपीतील भाजप सरकारवर केली. झाशीतील मोंट पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी कथित वाळूमाफिया पुष्पेंद्र यादवला खोट्या चकमकीत गोळ्या घालून मारल्याचा गंभीर आरोप अखिलेश यांनी मयत पुष्पेंद्रच्या कुटुंबियांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

रविवारी ‘वाळू माफिया’ पुष्पेंद्र यादवने पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने त्याचा ट्रक अडवल्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात मोंटचे ठाणेदार धर्मेंद्र चौहान हे जखमी झाले. त्यामुळे बचावासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात पुष्पेंद्रचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण झाशीचे पोलीस अधीक्षक ओ.पी. सिंग आणि मोंटचे ठाणेदार चौहान यांच्या जबानीत तफावत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.

ते म्हणाले, यूपीत पोलीसच मॉब लिंचिंग करीत आहेत आमी त्यांना योगी सरकार पाठीशी घालत आहे. यूपी पोलिसांवर नागरिकांचा विश्वासच उरलेला नाही. राज्यात ‘राम राज्य’ आणण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी विचारतो कुठे आहे रामराज्य?, हे तर हिंसाचारी ‘नथुराम राज’ आहे.

पोलीस कारवाईत मारला गेलेल्या पुष्पेंद्रच्या कुटुंबीयांनी मात्र ठाणेदार धर्मेंद्र चौहान यांनी पुष्पेंद्रचा वाळूचा ट्रक सोडण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली.ती देण्यावरून झालेल्या वादात पोलिसांनी पुष्पेंद्रला खोट्या चकमकीत ठार केल्याचा गंभीर आरोप करीत ,याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

अखिलेश यांना वाळू माफियाचा पुळका – भाजप
सपा नेते अखिलेश यादव यांना वाळू माफियांचा मोठा पुळका आला आहे.त्यांना जनतेला होणाऱ्या त्रासाशी काही देणेघेणे नाहीय. जातीपातीचे राजकारण करून त्याचा लाभ उठवणे एवढेच त्यांना ठाऊक आहे. त्यांच्या या गुणामुळेच युपीच्या जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे ,असे प्रत्युत्तर जेष्ठ भाजप नेते सिद्धार्थ नाथ यांनी अखिलेश यांना दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या