लग्नातच खुर्च्यांची फेकाफेक, हुंड्यासाठी नवरदेवानं लग्न मोडलं?

उत्तरप्रदेशात एका लग्नात दोन्ही पक्षात जबरदस्त वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद पांघवला. मात्र नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरोहा जिल्ह्यात घडला आहे. यात पंधराजण जखमी झाले असून जखमींना सीएचसी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही पक्षाने एकमेकांवर आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

एसएसआय प्रमोदकुमार पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार बसंत विहार गजरौला येथील रहिवासी गोविंदसिंग यांची मुलगी पायलचे लग्न मुरादाबादच्या काशीराम कॉलनी येथील सेवानिवृत्त पीएसी कॉन्स्टेबल केवनसिंग याचा मुलगा सौरव याच्यासोबत ठरले होते. मात्र लग्नादरम्यान दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यात सुमारे 15 जण जखमी झाले.

वधूपक्षाच्या म्हणण्यानुसार लग्नाचा विधी सुरू असताना वरपक्षाने हुंडा मागितला. हुंड्यात 1 लाख रुपये आणि बुलेटची मागणी केली. मात्र हुंड्यासाठी नकार दिल्यानंतर वाद सुरू झाले. त्यामुळे हुंड्यासाठी नवरदेवाने लग्न मोडल्याचा आरोप केला आहे. तर वरपक्षाने हुंड्याचा आरोप फेटाळला आहे. पंखा खाली पडल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाले. वाद वाढून मारहाण सुरू झाली आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या. यामध्ये 15 लोकं जखमी झाली. वरपक्षाने सोन्याचे कुंडल आणि पैसे लुटल्याचा आरोप केला वधूपक्षावर केला आहे.

अखेर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले. दोन्ही पक्षात वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. रात्री नवरदेव नववधूशिवाय वरात घेऊन घरी परतले.

आपली प्रतिक्रिया द्या