गोव्यात आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मिळाले ‘धनुष्य-बाण’ चिन्ह

उत्तर प्रदेश आणि गोवा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उतरणार असून दोन्ही राज्यांतील निवडणुकांसाठी शिवसेनेने आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकांसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती कळवली आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे सात उमेदवार

उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यासाठी शिवसेनेच्यावतीने सात उमेदवार रिंगणात असणार आहेत. निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सामील 58 जागांसाठीच्या उमेदवारी अर्जाची छाननी केली आहे. या जागांसाठी 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. पहिल्या टप्प्यासाठी शिवसेनेच्या दहा उमेदवारांनी अर्ज भरला. त्यापैकी तीन अर्ज निवडणूक आयोगाने रद्दबातल केल्याने शिवसेनेच्यावतीने आता पहिल्या टप्प्यात 7 उमेदवार मैदानात असतील.

शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार

  • खतौली – सेलू कश्यप
  • मेरठ कँट- दीपक सिरोही
  • दादरी – हेमंत शर्मा
  • सिकंदराबाद- अमित सिंह तोमर
  • अनूपशहर-रश्मी गोल्डी
  • मांट- राजकुमार धनगर
  • मथुरा- सत्येंद्र सिंह ठाकूर

नोएडा येथून राजकुमार अग्रवाल, धोलाना येथून सोनू तोमर आणि डिबाईमधून भगवान शर्मा उर्फ गुड्डू पंडित यांचे अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केले आहेत.

शिवसेनेने जाहीर केली गोव्यातील नऊ उमेदवारांची नावे

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र शैलेश वेलिंगकर यांना शिवसेनेने पणजीतून उमेदवारी दिली असून उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊन त्यांना पाठिंबा देऊ, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

खासदार राऊत यांनी गोव्यातील शिवसेना उमेदवारांची यादी एका भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केली. पेडणे येथून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवोली, विन्सेंट परेरा, हळदोणे – गोविंद गोवेकर, पणजी – शैलेश वेलिंगकर, पर्ये – गुरुदास गावकर, वाळपई – देविदास गावकर, वास्को – मारुती शिरगावकर आणि केपे मतदारसंघातून अॅलेक्सी फर्नांडिस यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. गोव्यातील भ्रष्ट सरकारला घरी बसवायचे असेल तर सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे. शिवसेनेने कायम नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजप विरोधात गोव्याच्या जनतेत प्रचंड असंतोष असून कोणत्याही परिस्थितीत भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही असे खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.