भयंकर! मुख्याध्यापकाकडे 8वी च्या विद्यार्थिनीने तक्रार केली, शिक्षकाने गोळ्या घालून हत्या केली

1566

उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या एका गावात भयंकर घटना घडली आहे. 8 वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची माजी शिक्षकाने गोळ्या घालून हत्या केली आहे. या शिक्षकाविरोधात विद्यार्थिनीने तक्रार केली होती. या तक्रारीमुळे भडकल्याने शिक्षकाने तिला मारून टाकले. शैलेंद्र सिंह (25 वर्ष) असं या शिक्षकाचे नाव आहे.

पीडित मुलीचा शैलेंद्र हा गेल्या काही दिवसापासून पाठलाग करत होता. या शैलेंद्रला शाळेने आधीच काढून टाकलं होतं. शैलेंद्रच्या त्रासामुळे ही मुलगी त्रस्त झाली होती. त्रास सहन न झाल्याने तिने धीर एकवटून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीमुळे शैलेंद्र भडकला होता. गुरुवारी ही मुलगी तिच्या शाळेतील मित्रासोबत जात होती. यावेळी शैलेंद्र त्याच्या एका साथीदारासोबत दुचाकीवरून आला. या दोघांनी मुलीला जबरदस्ती दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. मुलीने याला कडाडून विरोध केल्याने शैलेंद्रने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याने मुलीच्या गळ्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीसोबत असलेला तिचा मित्र हा या घटनेचा मुख्य साक्षीदार आहे.

या मुलीला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच ग्रामस्थ भडकले आणि त्यांनी शाळेवर हल्ला केला. त्यांनी शाळेतील सामानाची नासधूस केली आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण देखील केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कसंबसं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. कानपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनुराग वत्स यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

शैलेंद्र हा या मुलीला अश्लील मेसेज पाठवत होता. याची तक्रार तिने मुख्याध्यापकांकडे केल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. मुलीची हत्या झाली तेव्हा ती सहामाही परीक्षा देऊन घराकडे परत येत होती.

आपली प्रतिक्रिया द्या