सूड घेण्यासाठी चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या वडिलांना धडा शिकवण्यासाठी आरोपीने हे पाऊल उचलल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे मयत पीडितेच्या वडिलांसोबत वर्षाभराआधी जमिनीच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १० जून रोजी पीडित मुलीचे तिच्याच राहत्या घरासमोरून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिला एका उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिथेच तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला. गावातल्या लोकांनी पीडितेचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना सदर प्रकाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, एका वर्षाआधी आरोपीने पीडितेच्या वडिलांना जमीन खरेदी करण्यासाठी पैसे उधार दिले होते. परंतु त्यांनी आरोपीला पैसे परत न केल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. पीडितेच्या घरातल्यांचाही संशय सदर आरोपीवरच होता. कारण आरोपी मागील अनेक दिवसांपासून पीडितेच्या कुटुंबाला धमक्या देत होता. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात ३०२ आणि ३७६ कलम आणि पोक्सो कायद्यांर्तंगत गुन्हा नोंदविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या