फिरोजाबाद येथे भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये जसराना भागात मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका व्यावसायिकाच्या तीन मजली इमारतीच्या तळघरात बांधलेल्या फर्निचर शोरूममध्ये सायंकाळी 6.30 वाजता ही आग लागली. काही वेळातच ही आग संपूर्ण तीन मजली घरात पसरली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.

ज्यावेस आग लागली त्यावेळेस दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर व्यापारी कुटुंबातील सदस्य अडकले होते. आग इतकी भीषण होती की घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. सुमारे तीन तासांनंतर अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान वरच्या मजल्यावर पोहोचले.

मात्र येथे व्यापारी कुटुंबातील सहा जणांचे जळालेले मृतदेह सापडले. मृतांमध्ये दोन महिला, एक तरुण आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. जसराना तहसीलपासून 14 किमी अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील रमण राजपूत यांच्या तीन मजली घरात तळमजल्यावर फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आहे. त्यांचे कुटुंब आणि दोन मुले दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतात.

दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून मनोज (35), नीरज (33), भरत (15), हर्षवर्धन (12), शिवानी (22), तेजस्वी (6 महिने) यांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत जळाले होते. फिरोजाबाद येथे लागलेल्या आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य राबवण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.