शाळेत मिळालेल्या वागणूकीने विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, चिठ्ठी वाचून साऱ्यांचे डोळे पाणावले

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका सातवीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने लिहीलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचे कारण समोर आले आहे. मात्र कारण जाणून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तर मुलाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यश मौर्य असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो रायबरेली बछरावाच्या सेहंगो गावातील रहिवासी आहे. विद्यार्थी यश मौर्य गेल्या 5 वर्षांपासून आई-वडिलांपासून 40 किमी अंतरावर राहत असलेल्या काकांकडे शिक्षणासाठी आला होता. गुरुवारी त्याची परीक्षा होती, त्यावेळी तो कॉपी करताना पकडला गेला. त्यावेळी शिक्षिकेने त्याला वर्गातच शिक्षा दिली. त्यानंतर मुख्याध्यापकांकडे घेऊन गेल्या. कुटुंबियांचा आरोप आहे की, शिक्षिकेने दिलेला त्रास सहन करु न शकल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

यशने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहीली असून त्यात लिहीलेय, ”काका-काकू मला माफ करा. माझ्या वडिलांची काळजी घ्या. चुकीनंतर प्रत्येकाला एक संधी द्यायला हवी. मी माझ्या चुकीबाबत रडत आहे. मी माझ्या मित्रांमध्ये शरमेला झालो आहे. सगळे शेम शेम बोलत होते. आता मला हे सगळं सहन होत नाही”. ही चिठ्ठी वाचून घरचेच नाही तर शेजारीही भावूक झाले. जवाहर विहार कॉलनीतील निवासी यशच्या काकांनी, शाळेवर कारवाई करण्याची मागणी करत न्याय मागितला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या सीओ सिटी वंदना सिंह यांनी सांगितले की, वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक अॅंगलने तपास केला असता दोषिंविरोधात कारवाई करुन पिडीत मुलाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.

भावाच्या मृत्यूनंतर शाळेत शिकणाऱ्या बहिणीने रडतच, दादा शाळेतून निघाल्यानंतर शाळेच्या बसमध्ये खाली मान घालून बसला होता. घरी आल्यानंतर तो सरळ वर खोलीत निघून गेला. त्यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेबाबत यशच्या आई-बाबांनवा धक्का बसला आहे. दोघंही गावातून यशच्या काकांच्या घरी आले. आई-वडिलांनी सांगितले की, मुलाला भावाच्या घरी शिक्षणासाठी पाठवले होते. विचार केला होता मुलगा शिकून चांगले नाव कमवेल. मात्र, स्वप्नातही असा विचार केला नव्हता.