तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात याचा आम्ही पुरावा मागितलाय का! सरमांचे वादग्रस्त विधान

उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार रंगात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेमध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावरून सरमा यांनी राहुल यांच्यावर टीका केली. ‘त्यांची मनोवृत्ती पाहा त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले’ असं विधान करत असताना सरमा यांनी म्हटले की ‘तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात याचा आम्ही पुरावा मागितलाय का ?’

सरमा यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की ‘जनरल बिपीन रावत हे उत्तराखंडचे तसेच संपूर्ण देशाचे गौरवाचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राहुल गांधी यांनी पुरावे मागितले, त्यांची मेंटॅलिटी काय आहे ते पाहा. आम्ही तुमच्याकडे, तुम्ही कोणाचा मुलगा आहे याचा पुरावा कधी मागितलाय का ? सैन्य दलाकडे पुरावे मागण्याचा तुमच्याकडे काय अधिकार आहे? तुमचा बिपीन रावत यांच्यावर विश्वास नाहीये का ?’

सरमा यांनी उत्तराखंडमधील किच्छा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की काँग्रेसमध्ये जिन्ना यांचा आत्मा घुसलाय की काय असा प्रश्न पडतो. काँग्रेस मदरसे उघडण्याचं समर्थन ककरते, मुस्लिम विद्यापीठ सुरू करण्याचे समर्थन करते आणि ती हिजाब घालण्याचेही समर्थन करते असं म्हणताना सरमा म्हणाले की काँग्रेस धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.