पाळीव कुत्र्याला दारू पाजली, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

उत्तराखंड येथील एका तरुणीने आपल्या पाळीव कुत्र्याला बियर पाजल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी संतापले असून तरुणीच्या या कृत्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. हा व्हिडीओ डेहरादून येथील असल्याची माहिती मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये ही तरुणी तिच्या पाळीव कुत्र्याला जबरदस्तीने दारू पाजताना दिसत आहे. या कृत्याची मजा वाटून ती हसते आणि तिचा कुत्रा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पाय झाडताना दिसतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.

लोकं लाईक, कमेंट्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मुक्या जनावरांसोबत असं करणं चूक आहे. कमीत कमी जनावरांना तरी सोडा, असं म्हणत नेटकऱ्यांनी या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे.