अबब! उंदरांनी खाल्ला 581 किलो गांजा, पोलिसांनी न्यायालयात मांडली व्यथा

बिहारमध्ये दारु पिणाऱ्या उंदरांची बातमी आपण काहीदिवसांपूर्वी वाचली असेलच, मात्र आता मथुरेत गंजेडी उंदरांची बातमी समोर येत आहे. याच गांजा खाणाऱ्या उंदरांबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या उंदरांनी एक-दोन किलो नाही तर एकूण 581 किलो गांजा खाल्ला आहे.

त्याचे झाले असे की 2018-2019 मध्ये, मथुरा पोलिसांनी दोन ठिकाणाहून गांजा जप्त केला होता. पहिल्या ठिकाणाहून 386 किलो तर दुसऱ्या ठिकाणाहून 195 किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेला गांजा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या वेअरहाऊस मध्ये जमा करून ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा तस्करांना अटक केली होती.

याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींकडून पोलिसांच्या गांजा जप्त करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांकडे गांजा जप्त केल्याचे पुरावे मागवले. न्यायालयाने दोन्ही ठिकाणाहून जप्त केलेल्या सीलबंद गांजाची पाकिटे पोलिसांना न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले. मात्र वेअरहाऊस मध्ये जप्त करून ठेवलेला 581 किलो गांजा उंदरांनी खाल्ल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले. मथुरा पोलिसांनी न्यायालयात पोहोचून आपली व्यथा मांडली. न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी थोडा देखील गांजा उरला नसून जप्त करण्यात आलेला सगळा गांजा उंदरांनी फस्त केल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान पोलिसांच्या या युक्तिवादावर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. न्यायालयाने पोलिसांना पुढील सुनावणीत घटनेबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. 26 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता गांजाचे पुरावे सादर कसे करणार? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.