कोकण रेल्वे दोन तास ठप्प, भोकेजवळ यूटीव्ही मशीन घसरली

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

विद्युतीकरणाचे काम करणारे यूटीव्ही मशीन घसरल्याने आज कोकण रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प होती. सुट्टीचा हंगामा असल्याने गाडय़ांना प्रचंड गर्दी होती. त्यातच प्रचंड उकाडा असल्याने चाकरमानी चांगलेच घामाघुम झाले. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत कोकण रेल्वे मार्ग सुरळीत केला. सध्या मोठय़ा संख्येने गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर धावत असून या घटनेमुळे नियोजित स्थानकात पोहोचण्यास विलंब झाला.

आज सकाळी 11.15 वाजता भोके रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या यूटीव्ही मशीनचे चाक घसरले. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडये यांच्यासह रेल्वेचा अधिकारीवर्ग घटनास्थळी दाखल झाला. कोकण रेल्वेच्या पथकाने घसरलेले मशीन रुळावरून बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. दुपारी 1.30 वाजता वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर कोकण रेल्वेच्या गाडय़ा पुन्हा धावू लागल्या. दोन ते अडीच तास कोकण रेल्वे ठप्प होती.

आज दिवसभर तापमान 37 अंश असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ा उशिराने असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसीमधील प्रवाशांना जरी याचा त्रास झाला नसला तरी जनरल आणि स्लीपरच्या डब्यातील प्रवासी घामाने चांगलेच हैराण झाले.

दिवा-सावंतवाडी रत्नागिरी स्थानकात रखडली

यूटीव्ही मशीन घसरल्याने कोकण रेल्वेला मार्ग 11.15 वाजल्यापासून ठप्प होता. सुदैवाने तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या दोन्ही गाडय़ा रत्नागिरी स्थानकातून पुढे सरकल्या. 12 वाजून 38 मिनिटांनी आलेली 50106 दिवा-सावंतवाडी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. रुळावर घसरलेले इंजिन बाजूला केल्यानंतर 50106 दिवा-सावंतवाडी ही गाडी दुपारी 2 वाजून 3 मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकातून रवाना झाली.

अडीच ते तीन तासांचा विलंब…

मुंबईहून कोकण रेल्वे मार्गावर अप दिशेने जाणाऱ्या गाडय़ा अडीच तास उशिराने धावत होत्या. त्यात 10104 मांडवी एक्सप्रेस 48 मिनिटे, 02197 कोईंबतूर जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस तब्बल तीन तास 40 मिनिटे, 16334 वेरावल एक्प्रेस 40 मिनिटे, 22120 तेजस एक्सप्रेस 26 मिनिटे आणि 12052 जनशताब्दी एक्सप्रेस 23 मिनिटे उशिराने धावत होती. तर डाउन दिशेने जाणाऱ्या गाडय़ांमध्ये 12618 मंगला एक्सप्रेस दोन तास 24 मिनिटे, 22660 देहरादून कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस 30 मिनिटे, 10103 मांडवी एक्सप्रेस दोन तास 32 मिनिटे, 22654 हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस तीन तास 9 मिनिटे आणि 50105 दिवा सावंतवाडी पॅसेंजर 29 मिनिटे उशिराने धावत होती.