Tokyo Olympics – भालाफेक प्रशिक्षक उवे हॉन यांना नारळ दिला, नीरज चोप्रासाठी झाली होती नियुक्ती

हिंदुस्थानच्या अथलेटीक्स महासंघाने राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक उवे हॉन यांना नारळ दिला आहे. हॉन यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी लवकरच नव्या परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. हॉन हे जागतिक किर्तीचे भालाफेकपटू असून 100 मीटर लांबपर्यंत भाला फेकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

हॉन यांचा करार टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच होता, मात्र तो पुढे न वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की लवकरच 2 नवे प्रशिक्षक नेमण्यात येत असून त्यातील एक प्रशिक्षक हॉन यांची जागा घेईल. गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंह तूर याच्यासाठीही परदेशी प्रशिक्षक शोधला असल्याचं सुमारीवाला यांनी सांगितलं आहे.

उवे हॉन यांची नियुक्ती नोव्हेंबर 2017 मध्ये करण्यात आली होती. नीरज चोप्रा, शिवपाल सिंह आणि अनु राणी यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी हॉन यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज चोप्राने 2018 सालच्या राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र यानंतर जर्मनीच्याच क्लॉस बार्टोनीज यांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. उवे हॉन यांनी काही दिवसांपूर्वी अथलेटीक्स महासंघावर गंभीर आरोप केला होता. महासंघ आणि क्रीडा प्राधिकरणाने करार स्वीकारण्यासाठी आपल्याला ब्लॅकमेल केलं होतं असा आरोप हॉन यांनी केला होता. हा आरोप दोन्ही संस्थांनी खोटा असल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या