वि.शं. चौघुले

163

ठसा

आस्वाद आणि आलेख, साहित्याची आस्वादरूपे, मुक्तगद्य, जिव्हाळय़ाची माणसं, रघुवीर सावंत – बेरीज आणि वजाबाकी यांसारखी मोजकीच परंतु दखलपात्र पुस्तके वि.शं. चौघुले यांनी मराठी साहित्याला दिली. प्राध्यापकाचा पेशा प्रामाणिकपणे सांभाळून साहित्य, समीक्षा, लेखन, संवाद या क्षेत्रांना त्यांनी आपलंसं केलं. माणसांना जोडणारा हा समीक्षक अगदी सहज-सोप्या भाषेत लिखाण करत असे. मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील संस्कार त्यांनी कायम जोपासले. गिरगाव, माझगाव येथील बालपण, महानगरपालिकेचे शिक्षण, सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.ए. व एम.ए. हा शिक्षण प्रवास पार केल्यावर आर्यन हायस्कूल, श्रीरामपूर येथील महाविद्यालय, चिपळूणचे दातार महाविद्यालय, विलेपार्ले येथील महिला महाविद्यालय येथे त्यांनी शिक्षक, प्राध्यापक म्हणून योगदान दिले. विलेपार्ले येथील महिला महाविद्यालयातील २७ वर्षांच्या सेवेत ते मराठी  विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. नोकरीच्या या कालखंडात मराठी साहित्यावरील त्यांचे प्रेम फुलतच गेले. परिणामी विविध नियतकालिकांमध्ये ग्रंथपरीक्षणे लिहिणे, साहित्यिकांच्या मुलाखती लिहिणे सुरू असायचे.  निवडक परीक्षणांचे संकलन असलेला ‘ग्रंथसंवाद’ हा ग्रंथ १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. १९९७ मध्ये चौघुले सेवानिवृत्त झाले. हा काळ त्यांच्यासाठी अधिक ऊर्जा देणारा ठरला. कुणालाही हेवा वाटावा अशा पद्धतीने त्यांनी या वेळेचे सोने केले. समीक्षेतील आपला हातखंडा या काळात त्यांनी अधिक सिद्ध केला. लिखाणातील वैविध्य त्यांनी प्रत्येक पुस्तकात जपले. आस्वाद आणि आलेख, साहित्याची आस्वादरूपे ही समीक्षेची पुस्तके याशिवाय मी आणि माझे सुहृद, जिव्हाळय़ाची माणसं, मॅजेस्टिक कोठावळे, रघुवीर सावंत – बेरीज आणि वजाबाकी ही पुस्तके व्यक्तिचित्रणची आहेत. अध्यात्मावरची पुस्तके स्वतंत्र वृत्तीची आहेत. यात संत साहित्य आणि समाजप्रबोधन, संत समाज अध्यात्म, मी आणि माझा देव यांचा समावेश आहे. लेखक, प्राध्यापक आणि समीक्षक या तिन्ही प्रांतांची सरमिसळ न होऊ देता प्रत्येक भूमिकेला चौघुले यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी आपली आस्वादक वृत्तीही जोपासली. साहित्यिकांत आपल्या समंजसपणामुळे चौघुले उठून दिसत. त्यांचा सहभाग त्यांच्या निधनाने संपला असला तरी मराठी साहित्यातील योगदानात त्यांचा खारीचा वाटा कायम राहील हे निश्चित!

आपली प्रतिक्रिया द्या