अंथरुणास खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी नियोजन सुरू, माहिती पाठवण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी [email protected] या ई-मेल आयडी वर संपूर्ण माहिती पाठवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. ही लस घेऊ इच्छिणारे पात्र नागरिक लसीकरण केंद्रांवर येतात. नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांवर वेगवेगळ्या सुविधा देखील दिल्या जातात, जेणेकरून लसीकरण सुलभरीत्या पार पडावे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत.

असे असले तरी, आजारपणासह शारीरिक / वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, असेही नागरिक आहेत. अश्या व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे.

सर्व मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेने आवाहन केले आहे की, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे (bedridden) व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक (contact number), अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी. जेणेकरून अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या