मुलांच्या लसीकरणासाठी शाळा-कॉलेजमध्ये कॅम्प

मुंबईत 15 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा-कॉलेजमध्येही व्हॅक्सिनेशन पॅम्प सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण पालिका प्रशासनाने घेतला आहे. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. मुंबईत या वयोगटातील नऊ लाख लाभार्थी मुले आहेत. 3 जानेवारी रोजी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर 12 जानेवारीपर्यंत 1 लाख 8380 मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.

मुंबईत डिसेंबरअखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 150 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने थेट वीस हजारांचा टप्पा गाठल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांनाही लागण होत असल्याचे समोर आले असले तरी लसीकरण पूर्ण झाल्यामुळे तीव्र लक्षणे आणि मृत्यू होत नसल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र लसीचा एकही डोस घेतला नसलेल्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजनची गरज लागत आहे. शिवाय तिसऱ्या लाटेतील मृत्यूंमध्ये 94 टक्के मृत्यू लस न घेतलेल्या रुग्णांचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन एका महिन्यात पात्र लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे.

लसीकरणाची सद्यस्थिती

मुंबईत 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 18 वर्षांवरील पात्र 92 लाख लाभार्थी आणि इतर ठिकाणाहून मुंबईत आलेल्या नागरिक असे मिळून 108 टक्के लसीकरण तर एकूण 90 टक्यांवर दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

मुंबईत सद्यस्थितीत 461 व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू आहे. तर नऊ जम्बो सेंटर आणि रेल्वेच्या एका सेंटरवर मुलांसाठी लसीकरण सुरू आहे. मुलांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येत आहे. एका महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.

मुलांसाठी लसीकरण सेंटर वाढवण्यासाठी सकाळी कोव्हॅक्सिन आणि संध्याकाळी कोव्हिशिल्ड डोस, सेंटरवर एक ते दोन बूथ मुलांसाठी राखीव असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.