मुंबईत आजपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात

मुंबईकरांचे लसीकरण अधिक सुलभ आणि वेगाने व्हावे यासाठी पालिकेच्या 270 प्रभाग केंद्रांवर 100 टक्के ‘वॉक इन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झाले असून आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या डोससाठी 30 टक्के तर दुसरा डोस घेणाऱयांसाठी 70 टक्के लसीचा साठा वापरला जाणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरण मोहीम जोमाने राबवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील लसीकरणाला अनेक वेळा ब्रेक घ्यावा लागत आहे. लसीच्या तुटवडय़ामुळे बुधवारी लसीकरण बंद ठेवावे लागले.

मात्र आज संध्याकाळपर्यंत महापालिकेला कोविशिल्डचे 57 हजार तर कोव्हॅक्सिनचे 48 हजार डोस असे एकूण 1 लाख 5 हजार डोस उपलब्ध झाले असल्यामुळे, 5 ऑगस्टपासून लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

सरकारी, पालिका रुग्णालये, कोरोना सेंटर्सवर 50-50 सुविधा

गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱया व्यक्तींना त्यांच्यासाठी निर्देशित केलेल्या लसीकरण केंद्रावरच लस घेता येणार आहे. 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व म्हणजे सरकारी, महानगरपालिका रुग्णालये आणि कोरोना सेंटर्समधील केंद्रावर 50 टक्के नोंदणी आणि 50 टक्के थेट येणाऱयांना (वॉक इन) लसीकरण याप्रमाणेच लस घेता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या