ठाण्यासाठी शिवसेनेचा वचननामा, विकास हाच शिवसेनेचा अजेंडा

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणेकरांचे शिवसेनेशी गेल्या 25 वर्षांचे अतूट, अभेद्य आणि विश्वासाचे नाते आहे.  सर्वसामान्य ठाणेकरांसाठी केलेली विकासकामे हाच शिवसेनेचा  अजेंडा असून त्या बळावर शिवसेनेचा भगवा महापालिकेवर डौलाने फडकणारच, असा जबरदस्त विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येत्या पाच वर्षांत ठाणे विकासाची नवी उंची गाठेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या वचननामाचे प्रकाशन आज हॉटेल टिपटॉप येथे करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, उपनेते दशरथ पाटील, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर संजय मोरे, सभागृहनेत्या अनिता गौरी, उपमहापौर राजेंद्र साप्ते उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या 25 वर्षांत शिवसेनेने ठाण्यात असंख्य विकासकामे केली. त्यामुळेच ठाणेकरांनी सातत्याने शिवसेनेला विजयाचे दान दिले. शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, पायवाटा आणि गगनचुंबी इमारत नव्हेत तर उद्याने, तलाव, क्रीडा, सुविधा, आरोग्य, शैक्षणिक संकुले यांचेही मोलाचे योगदान असते. त्यामुळेच येत्या पाच वर्षांत ठाण्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱया अनेक प्रकल्पांची पूर्तता करण्याचा संकल्प शिवसेनेने सोडल्याचे त्यांनी सांगितले.

क्लस्टर, मेट्रोसाठी फक्त शिवसेना लढली

शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू व्हावी यासाठी प्रखर लढा दिला. सरकारने ही योजना मंजूर केली असून न्यायालयाची अंतिम मान्यता मिळताच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. ठाण्यातील मेट्रोचा मुद्दाही शिवसेनेच्या नेत्यांच्याच आंदोलनामुळे मार्गी लागला. येत्या पाच वर्षांत मेट्रोचे जाळे शहराच्या अन्य भागात विस्तारावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शिवसेना ताकदीनिशी पाठपुरावा करेल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

टीका करणाऱयांकडे सांगायला दुसरे आहे काय?

हा विकास शिवसेनेने नव्हे तर आयुक्तांनी केला, अशी टीका विरोधक करत आहेत, याकडे लक्ष वेधताच शिंदे म्हणाले, टीका करणाऱयांकडे सांगायला दुसरे आहे काय? महापालिकेत  शिवसेनेची सत्ता आहे. विकासाचे सगळे प्रस्ताव आधी महासभेत मंजूर होतात आणि मग त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात.  राज्यात विकासकामांची अंमलबजावणी आयुक्त स्वाधीन क्षत्रिय करत असतील तर तो विकास आयुक्तांनी केला आणि मुख्यमंत्र्यांचे त्यात काहीच योगदान नाही असे म्हणायचे काय? असा सवालही त्यांनी केला. आम्ही कोणाचेही श्रेय उपटण्याच्या भानगडीत पडत नाही. सरकार कुणाचेही असो, काम करून घेण्याची धमक शिवसेनेत आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सोशल मीडियावरून गरळ ओकणाऱयांविरोधात तक्रार

फेसबुक आणि सोशल मीडियावरून शिवसेनेवर गरळ ओकली जात आहे.  याविरोधात पोलीस आणि सायबर क्राइम विभागाकडे शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे, असे सांगतानाच यामागचा बोलविता धनी कोण आहे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले.

शिवसेनेची विकासकामे मोजताना विरोधकांना धाप लागेल

थापा मारून एक-दोनदा जिंकून येता येईल, पण शिवसेना सलग 25 वर्षे जिंकून येत आहे ती ठाणेकरांच्या विश्वासाच्या जोरावरच. शिवसेनेने इतकी विकासकामे केली आहेत की ती मोजताना विरोधकांना धाप लागेल. शिवसेना कामे करते म्हणूनच वचननामा प्रकाशित करते. निवडणुका बघून आम्ही कामे करत नाही. वर्षभर शिवसेनेची विकासकामे सुरूच असतात असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या